भोसरी उड्डाणपुलाचा श्वास गुदमरतोय, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:53 AM2018-01-04T02:53:24+5:302018-01-04T02:53:32+5:30
अतिक्रमणांची बजबजपुरी, अनधिकृत फ्लेक्सबाजी, खासगी वाहनांचा थांबा, जागोजागी कच-याचे ढीग, वाहतूककोंडी व त्यावरून होणारी वादावादी हे वर्णन एखाद्या भाजी मंडई परिसराचे नसून, पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील उड्डाणपुलाचे आहे.
भोसरी - अतिक्रमणांची बजबजपुरी, अनधिकृत फ्लेक्सबाजी, खासगी वाहनांचा थांबा, जागोजागी कच-याचे ढीग, वाहतूककोंडी व त्यावरून होणारी वादावादी हे वर्णन एखाद्या भाजी मंडई परिसराचे नसून, पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील उड्डाणपुलाचे आहे. वाहतूककोंडी सोडविण्याच्या मूळ उद्देशाने उभारलेला हा पूल नियोजनाअभावी अक्षरश: असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.
पुणे-नाशिक महामार्ग आणि भोसरी-आळंदी चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भोसरीमध्ये उड्डाण पूल उभारला आहे. सुमारे चौदाशे मीटर लांबी व १९.७ मीटर रुंदी असा हा भव्यदिव्य उड्डाण पूल आहे. सुरुवातीपासूनच हा उड्डाण पूल वादग्रस्त ठरला. या उड्डाणपुलासाठी ४८ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र उड्डाणपुलाच्या कामास झालेल्या विलंबामुळे या पुलाचा खर्च सुमारे शंभर कोटी रुपयांवर पोहोचला. तब्बल पावणेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. राजमाता जिजाऊ असे या उ़ड्डाणपुलाचे नामकरण करण्यात आले. उड्डाणपुलाखाली अतिक्रमण होऊ नये यासाठी या ठिकाणी उद्यान विकसित करण्याचे प्रस्तावित होते. उद्यानाबरोबरच वाहनतळ तसेच पुलाच्या उताराच्या ठिकाणी हिरवळ आच्छादण्यात येणार होती. या कामासाठी स्वतंत्रपणे दहा लाख रुपयांची तरतूददेखील करण्यात आली होती. मात्र, नियोजनाअभावी हा उड्डाण पूल सद्य:स्थितीमध्ये निरूपयोगी ठरत आहे.
अतिक्रमणांमुळे पुलाखाली व आसपासचा परिसराची रया गेली आहे. पुलाखाली वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. अनधिकृत वाहनतळाचा येथे अड्डा बनला आहे. तीन आसनी, सहा आसनी रिक्षा, खासगी प्रवासी वाहतूक करणाºया लक्झरी बसेस, मालवाहतुकीची वाहने असा सारा लवाजमा पुलाखाली जमा होत आहे. कोणतीही शिस्त न बाळगता, सर्व नियम धाब्यावर बसवून उभ्या राहणाºया वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.
उड्डाणपुलाखालील जागा अक्षरश: टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. दिवस-रात्र काही लोक येथे ठिय्या मांडून बसलेले असतात. फेरीवाल्यांनी उड्डणपुलाखालील जागा म्हणजे हक्काची आणि फुकटची भाजी मंडई करून टाकली आहे. उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या दुकानांना स्वतंत्र वाहनतळाची सोय नाही. ट्रॅक्टर, ट्रक, जेसीपी अशी वाहने वेडीवाकडी उभी असतात. फेरीवाले, दुकानदार तसेच फळविक्रेते पुलाखालीच कचरा टाकतात. त्यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघातही झाले आहेत. भोसरीतून थेट बाहेर पडणाºयांकडून उड्डाणपुलाचा वापर होतो. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश आहे. बसथांबा उड्डाणपुलाखाली असल्याने एस. टी., पीएमपीएमएल बसेसला साईड रस्त्यानेच यावे लागते. त्यामुळे उड्डाणपुलावर तुरळक वाहने दिसत असताना पुलाखाली वाहतूककोंडीचे विदारक चित्र पहायला मिळते. दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत असल्याने येथील वाहतूककोंडीचा प्रश्न अधिकच जटिल होत चालला आहे. उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवून या ठिकाणी पे अॅण्ड पार्क योजना राबवावी, उद्यान विकसित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे. परंतु अतिक्रमण विभाग भोसरीत फक्त नावालाच आहे. पुलाखाली असणा-या हातगाड्या, थांबणारी वाहने, चौकात उभे राहून बघ्याची भूमिका घेणारे वाहतूक पोलीस यामुळे भोसरी उड्डाणपुलाला अवकळा आली आहे.
उद्यान कागदोपत्री : प्रशासनाचा कारभार
या पुलाखालील उद्यान अद्याप कागदोपत्री आहे. मात्र काही दिवसांपूर्वी अस्तित्वातच नसलेल्या उद्यानाची देखभाल आणि सुरक्षेचे काम भोसरीतील एका संस्थेला देण्याचा ठराव आयत्या वेळी संमत करून स्थायी समितीने कहर केला होता. त्यावरून राजकीय वादंगही उठले होते. पुलाच्या बाजूला ड्रेनेज लाइन शिफ्ट करण्यासाठी दोन कोटी १९ लाख ७० हजार ७००, सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण व पावसाळी पाण्याची निचरा करण्याच्या सुविधेसाठी एक कोटी ७८ लाख आणि सर्व्हिस रस्त्याचे बीट युमीन पद्धतीने डांबरीकरणाचा अंतिम थर देण्यासाठी एक कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार होता. या कामांचे आणि खर्चाचे काय झाले हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
बॅनरबाजीसाठी हक्काचे ठिकाण
संपूर्ण शहरात जेवढे अनधिकृत फ्लेक्स नसतील तेवढे फ्लेक्स एकट्या भोसरी परिसरात पहायला मिळतात. अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरातबाजीसाठी भोसरी उड्डाण पूल म्हणजे हक्काची जागा बनली आहे. राजकीय कार्यकर्ते फुकटची फ्लेक्सबाजी करून नेतेगिरीची हौस भागवून घेतात. अनेक खासगी जाहिरातींचे बॅनर पुलाच्या खांबांना चिटकवण्यात आले आहे. त्यामुळे पुलाचे विद्रूपीकरण झाले आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारांमुळे उड्डाणपुलाचे सौंदर्य व महत्त्व नामशेष होत आहे. उड्डाणपुलाखाली ठिकठिकाणी कचरा व राडारोडा पडल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येते.
या परिसरात ठिकठिकाणी तळीरामांची टोळकी दारू पिऊन धिंगाणा घालत असतात. अवैध पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. अशा व्यवसायांवर कारवाई करण्यास आलेल्या ई प्रभाग अतिक्रमण विभागाच्या कर्मचाºयांनाही दबावापोटी रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागते.