भोसरीत नालेसफाई नावालाच
By Admin | Published: May 24, 2017 04:08 AM2017-05-24T04:08:31+5:302017-05-24T04:08:31+5:30
शहरातील मॉन्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. नालेसफाईची सुरू असलेली कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : शहरातील मॉन्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. नालेसफाईची सुरू असलेली कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत, तर काही भागांत नालेसफाईच्या कामाला अद्याप सुरुवातच न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘ई’ प्रभागात कामाची निविदा मंजूर होऊन महिना उलटून गेला, तरीही अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील लोकवस्ती, तसेच औद्योगिक परिसराला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुदतीच्या आत सर्व विभागातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत. त्यानुसार अनेक भागांतील कामे पूर्णत्वास आली आहेत, तर काही भागांत अद्याप नाल्यातील गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असले, तरी ई प्रभागातील बहुतांश भागात नालेसफाईच्या कामांना अद्याप सुरुवातच झालेली नाही.
या परिसरात बहुतांश झोपडपट्ट्या आहेत. तसेच औद्योगिक परिसर असल्याने येथील गटारे व नाले १२ महिने तुंबलेले असतात. येथील रहिवासी दैनंदिन कचरा नाले व गटारात टाकत असल्याने नालेसफाईच्या कामात अडथळे निर्माण होतात.
परिणामी ही कामे करायला कोणीही कंत्राटदार पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे. असे असले, तरी या परिस्थितीचा फटका या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना बसत आहे. मॉन्सूनपूर्व कामे न झाल्याने या विभागातील बहुतांश नाले व गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत.
त्यातून कमालीची दुर्गंधी
येत आहे. पावसाळ्यात हीच परिस्थिती राहिल्यास नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.