‘स्थायी’ अध्यक्षपद मिळणार भोसरीला?
By admin | Published: March 23, 2017 04:29 AM2017-03-23T04:29:22+5:302017-03-23T04:29:22+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. स्थायी समितीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा भोसरीला झुकते माप दिले जाणार असून, ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आहे. त्यामुळे सर्वच विषय समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व राहणार आहे. महापौर व उपमहापौरपदाची निवड झाल्यानंतर विषय समिती सदस्य आणि अध्यक्ष यांची तातडीने निवड होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे पहिल्या सभेत निवड झाली नाही. सदस्यनिवडीसंदर्भात भाजपाच्या नगरसेवकांची आज सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीची वेळ दुपारी दोनची होती. सुरुवातीला भोसरी विधानसभेतील सदस्यांची दांडी होती. सोशल मीडियावर याची चर्चा झाल्यानंतर दुपारी महापौर पक्षनेत्यांच्या दालनात आले. त्यानंतर भोसरीतील काही नगरसेवक आले.
स्थायी समितीत आपली वर्णी लागावी, यासाठी नगरसेवक तीव्र इच्छुक असतात. स्थायी समितीत संधी नाही मिळाली, तर इतर समितीच्या सभापतिपदी वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी पवार
म्हणाले, ‘‘समिती सदस्य निवडताना संपूर्ण शहराचा विचार करून आणि नेत्यांचे एकमत होऊन सदस्य नियुक्ती होणार आहे.’’(प्रतिनिधी)