भोसरीत तरुणाची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंप मालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:57 PM2021-07-14T21:57:25+5:302021-07-14T21:58:10+5:30
पेट्रोलपंपावर मयत तेजस याने पैशांची अफरातफर केली, असे म्हणून आरोपीने तेजस याला बोलावून घेत मारहाण केली होती.
पिंपरी : तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. भोसरी येथे मंगळवारी (दि. १३) ही घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंप मालकाला पोलिसांनीअटक केली आहे.
तेजस सूर्यकांत तावरे (वय २३, रा. भोसरी, मूळ रा. लिंगी पिंपळगाव, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश सुरेश लांडगे (वय २८, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), असे अटक केलेल्या पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे. अमरजा सचिन पालकर (वय २५, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली), यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील सदगुरुनगर येथे लक्ष्मी एनर्जी ॲण्ड फ्यूल पेट्रोल पंप आहे. आरोपी लांडगे हा या पंपाचा मालक आहे. पंपावर मयत तेजस याने पैशांची अफरातफर केली, असे म्हणून आरोपीने तेजस याला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने त्याच्या ऑफिसमध्ये तेजसला मारहाण केली. तसेच त्याची दुचाकी व मोबाइल आरोपीने ठेवून घेतला. तसेच तुझ्या आईवडिलांना फोन करून सांगून पोलीस केस करतो, अशी धमकी आरोपीने दिली. तेजस याच्यावर आरोपीने दबाव टाकून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले.
तेजस याने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तेजसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, तेजसने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. मयत तेजस याची बहीण अमरजा पालकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.