पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:21 PM2019-07-28T13:21:08+5:302019-07-28T13:22:00+5:30
दुपारनंतर पावसाचा जाेर अधिक वाढल्याने पर्यटकांसाठी भुशी धरण पुन्हा बंद करण्यात आले.
लोणावळा : सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर आज सकाळी काहिसा कमी झाल्याने शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले भुशी धरण आज सकाळपासून पर्यटकांकरिता खुले करण्यात आले होते. मात्र दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर पर्यटकांचे जाणे बंद करण्यात आले. तसेच धरणावर लोणावळा शहर पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिली.
शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शहरातील विविध भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला. लोणावळा व मावळ तालुक्यासह सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने आज लोणावळ्यात येणार्या पर्यटकांची संख्या घटली होती. भुशी धरणावर जाण्यास पर्यटकांना सकाळी मुभा देण्यात आली होती. परंतु दुपारनंतर पावसाचा जाेर वाढल्याने पुन्हा एकदा भुशी घरण पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. लोणावळा परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पर्यटकांनी परिस्थितीचा आढावा घेत घराबाहेर पडावे तसेच लोणावळेकर नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर येऊ नये अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. शहरात पुर परिस्थिती होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात असून नगरपरिषदेचे आपत्कालिन पथके शहरात गस्त घालत आहेत. कोठेही पाणी साचल्याची समस्या निर्माण झाल्यास नगरपरिषदेच्या आपत्कालिन कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.
सकाळी असलेली पर्यटकांची गर्दी