पिंपळे सौदागरला सायकल शेअरिंग सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:52 AM2018-08-27T01:52:41+5:302018-08-27T01:53:07+5:30
महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पिंपळे सौदागर येथे सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली.
रहाटणी : महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पिंपळे सौदागर येथे सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली. ५० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सायकलसाठी पाच रुपये प्रतितास भाडे आकारण्यात येणार आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर राहुल जाधव, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे आदी उपस्थित होते. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिका व एका खासगी कंपनीतर्फे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
पिंपळे गुरव येथेही सुविधेचे उद्घाटन
महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथेही सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली. येथील राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, सागर अंघोळकर, महेश जगताप उपस्थित होते.
भाडेतत्वावर सायकल
शेअरिंग सायकलची सुविधा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात काही पिंपळे सौदागर येथील काही हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली होती. प्रति तास दोन रुपयांप्रमाणे या सुविधे अंतर्गत सायकलला भाडे आकारण्यात येत होते. सुरुवातीचे काही दिवस याला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रतिसाद कमी झाला आणि सायकलही दिसून आल्या नाहीत. असे असतानाही पुन्हा तसाच उपक्रम महापालिका प्रशासनाने या परिसरात सुरू केला आहे. त्यामुळे या सुविधेला कसा आणि किती दिवस प्रतिसाद मिळणार, याबाबत नागरिकांतून चर्चा करण्यात येत आहे.