भोसरीत अतिक्रमणांवर ‘हातोडा’ : अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 05:58 PM2018-10-26T17:58:06+5:302018-10-26T18:14:22+5:30
कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आली.आजपर्यंतची भोसरीतील शुक्रवारी करण्यात आलेली कारवाई सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे.
भोसरी : भोसरीमधील कै.अंकुशराव लांडगे सभागृह परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी (दि. २६ आॅक्टो) ही कारवाई केली. या अनधिकृत पथारी अनधिकृत टपरी वाल्यांवर मोठा राजकीय वरदहस्त असल्याने खरंच कारवाई होणार का याकडे अख्ख्या शहराचे लक्ष लागले होते. कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आली.आजपर्यंतची भोसरीतील शुक्रवारी करण्यात आलेली कारवाई सर्वात मोठी असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय वरदहस्तातून भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले होते. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाचा परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील परिसर अक्षरश: गिळंकृत करण्यात आला होता. त्यामुळे शंभर कोटी खर्चून हा पूल उभारल्यानंतरही वाहतुकीची समस्या कायम आहे. भोसरीतील आजी-माजी आमदारांची मेहेरनगर असल्याने महापालिका कारवाईला धजावत नाही असा आरोप हि अनेक जण करत होते. महापालिकाच अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप होत होता. अखेर महापालिकेने अनेक तक्रारीवरून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि भोसरीत कारवाई झाली.
कारवाईची संवेदनशीलता लक्षात घेता महापालिकेने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडून मोठा पोलीस बंदोबस्त मागितला होता. शुक्रवारी दुपार पासून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या भागात १०० हून अधिक छोटी-मोठी दुकाने होती. टपऱ्या, हातगाड्या असून, गेल्या काही दिवसात येथे अनधिकृत भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. यासाठी ओटे देखील बांधून देण्यात आले होते. मंडई व्यतिरिक्त शॉपिंग बाजारच्या नावाखाली भोसरीतील गायरानाच्या मोकळ्या जागेत कपड्यांची दुकाने पत्राच्या शेडची बांधकामे करून थाटण्यात आली होती. हे अनधिकृत व्यापारी अगदी मुख्य रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती. याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. मात्र, आता आयुक्तांनी कारवाईचे धाडस केल्याने कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.