मोठी कारवाई! रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांकडून २१ इंजेक्शन हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:55 PM2021-05-10T19:55:21+5:302021-05-10T19:56:54+5:30
२१ रेमडेसिविर इंजेक्शनसह १० लाख ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत....
पिंपरी : महामारीच्या काळात जोखीम पत्करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी हजारो हात झटत आहेत. असे असतानाही पिंपरी चिंचवड शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २१ रेमडेसिविर इंजेक्शनसह १० लाख ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.
कृष्णा रामराव पाटील (वय २२, रा. थेरगाव), निखिल केशव नेहरकर (वय १९, रा. बिजलीनगर, चिंचवड), शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय ३४, रा. जयमल्हार नगर, दत्त कॉलनी, थेरगाव), अशी आरोपींची नावे आहेत. पुण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथे सरप्राइज नाकाबंदी सुरू असताना रविवारी (दि. ९) पहाटे पावणेतीनच्या सुमारास आरोपी पाटील व नेहरकर यांची दुचाकी थांबवून तपासणी केली. त्यावेळी आरोपींकडे दोन रेमडेसिविर मिळाले. आरोपी पांचाळ याच्याकडून इंजेक्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पांचाळ याला ताब्यात घेऊन त्याच्या चारचाकी वाहनातून १९ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले.
जप्त रेमडेसिविर गोदावरी मेडिकल स्टोअर्स (इन हाऊस क्रिस्टल हॉस्पिटल) व आयुश्री मेडिकल स्टोअर्स (संलग्न ओनेक्स हॉस्पिटल) यांच्या नावे अलॉट झाले होते. मात्र आरोपी पांचाळ याने ते इंजेक्शन शासनाने वाटप केलेल्या हॉस्पिटलला न देता शासन, हॉस्पिटल व रुग्णांची फसवणूक केली.
केमिस्टकडून काळाबाजार
आरोपी पांचाळ हा केमिस्ट आहे. आरोपी पाटील हा क्रिस्टल हॉस्पिटल येथे राहण्यास असून नर्सिंग स्टाफमध्ये आहे. तसेच आरोपी नेहरकर हा ओनेक्स हॉस्पिटल येथे राहण्यास असून, डिलिव्हरी बॉय आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यात येईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, सुनील टोणपे, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, उपनिरीक्षक अवधूत शिंगारे, पोलीस कर्मचारी दत्तप्रसाद चौधरी, जितेंद्र जाधव, जितेंद्र उगले, आतिष जाधव, होमगार्ड निखिल सपकाळ व रोहन गुंड, अन्न व औषध प्रशासनाच्या भाग्यश्री यादव आणि श्रुतिका जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.