किशोर आवारे प्रकरणात मोठी अपडेट! कानशिलात लगावली म्हणून हत्या, गौरव खळदेने रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 01:03 PM2023-05-14T13:03:13+5:302023-05-14T14:02:34+5:30
नगर परिषदेच्या इथे आवारे यांनी सर्वांसमोर भालचंद्र खळदे यांच्या कानशिलात लगावली, म्ह्णून गौरव खळदेने हत्या घडवून आणली
पिंपरी : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली होती. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर, संदीप मोरे (रा. आकुर्डी), सीनु उर्फे श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगळ (रा.देहुरोड), गौरव खळदे (रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला वेगळं वळण मिळालं आहे. आवारे यांनी डिसेंबर महिन्यात भालचंद्र (भानू) खळदे यांना नगर परिषदेतील सीईओच्या दालनात सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. हाच बदला घेण्यासाठी भालचंद्र खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१२) किशोर आवारे यांची तळेगाव नगपरिषदेच्या आवारात गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखाचे पथकाने शनिवारी दुपारपर्यंत रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर यांना अटक केली. तर, खंडणी विरोधी पथक २ यांनी संदीप मोरे याला बातमीदारामार्फेत मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्वेनगर येथून अटक केली आहे.
आठ दिवसांची कोठडी
आरोपी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर, संदीप मोरे यांना पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालाने त्यांना आठ दिवसांची कोठडी सुनावली.
गुन्हेगारांना अटक करून कडक शिक्षा करावे
मावळ परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढत आहे. जमिनींना सोन्याचा भाव आल्याने तसेच राजकीय वर्चस्वाच्या वादामध्ये खून होण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची तळेगाव मध्ये निघृणपणे हत्या करण्यात आली होते. तर काही दिवसांपूर्वी सोमाटणे फाटा येथे एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी नगरपालिका आवारामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चार जणांनी येऊन आवारे यांच्यावर गोळीबार केला तसेच ते जमिनीवर धारातीर्थी पडल्यानंतर शरीर निपचित झाल्यानंतर हल्लेखोर त्यांच्यावर वार करत होते. अगदी अमानुषपणे! सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अंगावर काटे आणल्याशिवाय राहत नाही. ही घटना समोर घडत असताना कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर हत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मावळ परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारांना कशाचीही भीती न राहिल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर गुन्हेगारांना अटक करून कडक शिक्षा करावे, अशी मागणी होत आहे.