जैवविविधता समितीचा कारभार कागदावरच! महापालिकेचे सर्वेक्षण अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:50 AM2019-03-20T01:50:04+5:302019-03-20T01:50:32+5:30
महापालिकेच्या वतीने जैवविविधता समिती स्थापन केली आहे. गेल्या तीन वर्षांत या समितीचे काम कागदावरच राहिले असून, शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण अपूर्णच आहे.
- विश्वास मोरे
पिंपरी - महापालिकेच्या वतीने जैवविविधता समिती स्थापन केली आहे. गेल्या तीन वर्षांत या समितीचे काम कागदावरच राहिले असून, शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण अपूर्णच आहे. केवळ बैठका घेणे, सहली काढणे यापलीकडे कोणतेही ठोस काम झालेले नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या राज्य शासनाच्या नियमानुसार २०१६ मध्ये जैवविविधता समिती स्थापन करण्यात आली. महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना पहिले सभापती होण्याचा मान मोरेश्वर भोंडवे यांना मिळाला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उषा मुंढे यांची निवड झाली आहे.
शहरातील जैवविविधतेविषयी कामकाज होणे या समितीकडून अपेक्षित असताना केवळ बैठक घेणे आणि सहलींचे आयोजन करणे यापलीकडे कोणतेही ठोस काम झालेले नाही.
महापालिका भवनात स्वतंत्र कार्यालय, वाहन व्यवस्था अशा विविध समितींसाठी असणाऱ्या सुविधाही या समितीस आहेत़ सभापतिपदासाठी आणि सदस्यांसाठी असणारे लाभ या समितीतून सदस्य उठवित असतात. मात्र, यातील किती सदस्यांना जैवविविधता म्हणजे काय? हे माहीत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ बैठका होण्यापलीकडे ठोस कामकाज झालेले नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उषा मुंढे यांना नियुक्त केले आहे. समितीत कमल घोलप, अर्चना बारणे, सुवर्णा बुर्डे, सारिका लांडगे, अनुराधा गोरखे, झामाबाई बारणे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांचा समावेश आहे.
शहरातल्या प्रचंड प्रमाणात झालेल्या काँक्रिटीकरणामुळे! पिण्यायोग्य पाणीही मिळत नसल्याने अनेक पक्षी दगावतात. कोणताच इलाज न राहिल्याने ओढ्यातले प्रदूषित पाणी पिऊन पक्ष्यांना अनेक आजार ही होतात. याबाबत पक्षी संवर्धनासाठी अलाईव्ह संस्थेने पुढाकार घेतला आहे.
उमेश वाघेला म्हणाले, ‘‘जागतिक चिमणी दिन आणि २ जागतिक जल दिनानिमित्त आपण सारेच मिळून संकल्प करुया, आपल्या घराच्या बाल्कनीत, टेरेसवर, गच्चीवर पाण्याचे एक भांडे चिऊताई आणि अशा अनेक तहानलेल्या पक्ष्यांसाठी ठेवूयात.’’
समितीसमोर आला नाही अहवाल
जैवविविधता समिती स्थापन झाल्यानंतर जैवविविधतेचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी सर्वेक्षणाबाबत कामाचा आदेशही देण्यात आला. संबंधित संस्थेने शहर परिसरात किती प्रकरची जैवविविधता आहे. प्राणी, पक्षी तसेच जलचर आणि उभयचर प्राणी यांची सद्य:स्थिती याबाबत पाहणी केली आहे. याबाबतचा चारशे पानांचा अहवाल तयार केला आहे. मात्र, तो अहवाल समितीसमोर मांडलेला नाही. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे.
जैवविविधता समितीच्या वतीने शहरातील जैवविविधतेविषयी गेल्या वर्षी सर्वेक्षण सुरू केले होते. त्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्यानुसार निष्कर्ष आणि शिफारशी याबाबतचा अहवाल समितीसमोर मांडण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- संजय कुलकर्णी, पर्यावरण विभागप्रमुख, महापालिका
महापालिकेच्या वतीने विविध समितीची निर्मिती केली जाते. मात्र, ध्येय आणि उद्धिष्टांची पूर्तता होत नाही. अशाच प्रकारे जैवविविधता समिती ही आजवर कागदावरच राहिली आहे. त्यातील किती सदस्यांना जैवविविधता म्हणजे काय? हे माहीत आहे, हे विचारल्यास उत्तर देता येणार नाही. पर्यावरणविषयक जाण असणाऱ्या व्यक्तींनाच अशा समितींवर संधी द्या. - मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते