Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची झुंज; नाना काटेंच्या माघारीमुळे महायुतीला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:51 PM2024-11-05T16:51:30+5:302024-11-05T16:52:29+5:30
महायुतीतील भाजपचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्यातच झुंज रंगणार
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात २१ उमेदवार उतरले आहेत. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी माघार घेतली असून, यंदा महायुतीतील भाजपचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्यातच झुंज रंगणार आहे.
महायुतीकडून चिंचवडची जागा भाजपला गेली असून, शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली. या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नाना काटे आणि माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचाही दावा होता. त्याशिवाय भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे व चंद्रकांत नखाते हेही इच्छुक होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर शत्रुघ्न काटे आणि नखाते यांनी माघार घेतली.
अजित पवार गटाच्या नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज दाखल केल्याने दिवाळीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटे यांची भेट घेतली. भोईर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतरही काटे उमेदवारीवर ठाम होते. माघारीची चर्चाच झाली नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी जगताप त्यांच्या घरी गेले, त्यांनी विनंती केली. त्यानंतर काटे यांनी माघार घेतली. चिंचवड मतदारसंघातून २८ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी सात जणांनी माघार घेतली.
यांनी घेतले अर्ज मागे
विठ्ठल उर्फ नाना काटे, अरुण पवार, संदीप चिंचवडे, शिवाजी पाडोळे, सीमा यादव, जितेंद्र मोटे, भरत महानवर.
रिंगणातील प्रमुख उमेदवार
शंकर जगताप (महायुती : भाजप), राहुल कलाटे, (महाविकास आघाडी : राष्ट्रवादी शरद पवार)
रिंगणातील इतर उमेदवार
भाऊसाहेब भोईर (अपक्ष), राजेंद्र गायकवाड (बहुजन समाज पार्टी), मारुती भापकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), रफीक रशीद कुरेशी (स्वराज्य शक्ती सेना), सतीश काळे (स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना), सिद्धिक इस्माईल शेख (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), अतुल समर्थ (अपक्ष), ॲड. अनिल सोनवणे (अपक्ष), करण गाडे (अपक्ष), जावेद रशीद शेख (अपक्ष), धर्मराज बनसोडे (अपक्ष), मयूर घोडके (अपक्ष), रवींद्र पारधे (अपक्ष), राजेंद्र पवार (अपक्ष), राजेंद्र काटे (अपक्ष), रुपेश शिंदे (अपक्ष), विनायक ओव्हाळ (अपक्ष), सचिन सिद्धे (अपक्ष), सचिन सोनकांबळे (अपक्ष).
एकूण अर्ज - ३२
बाद अर्ज - ५
वैध अर्ज - २८
मागे घेतलेले अर्ज - ७
एकूण उमेदवार - २१
मतदारसंख्या
एकूण : ६५५१०६
पुरुष : ३४४५९९
स्त्री : ३१०४५०