पिंपरी महापालिकेच्या विषय समितींवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:40 PM2018-05-10T14:40:31+5:302018-05-10T14:41:52+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा कला आदी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक गुरूवारी बिनविरोध झाली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा कला आदी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक गुरूवारी बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपचे सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. विषय समितींवर भाजपाचे वर्चस्व आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची मुदत संपली होती. त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांची मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. महापालिकेतील पक्षीय बलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज करणे, माघारीनंतर आज निवडणूक झाली. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरला नसल्याने सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली. विधी समिती सभापतीपदी भाजपच्या माधुरी कुलकर्णी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी स्वप्नील म्हेत्रे, शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी सीमा चौघुले आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी संजय नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी सभापतींचा सत्कार केला. सर्वच समितींवर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे.