भाजपातील धूसफूस कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:41 AM2018-04-28T06:41:12+5:302018-04-28T06:41:12+5:30

भाजपातील हुकुमशाहीबाबत कार्यकर्त्यांनी टीका केली होती.

The BJP continues to shake off | भाजपातील धूसफूस कायम

भाजपातील धूसफूस कायम

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग स्वीकृत सदस्यपद निवडीबाबत नाराजांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण एकाच दिवसात थंड झाले. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी शिष्टाई केली. त्यानंतर गुरुवारी रात्री भाजपाच्या निष्ठावंतांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्य निवडीत निष्ठावंतांना डावलले आहे. २४ पैकी एकाच निष्ठावान कार्यकर्त्यास न्याय दिला आहे. या प्रभाग समितीवर आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर सायंकाळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी उपोषणकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी कार्यकर्ते आणि नेते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आमदार जगताप यांनी, हे पद दोन वर्षांसाठीच आहे. पुढील वेळी निष्ठावंतांचाही विचार केला जाईल, असे मत व्यक्त केले होते.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भाजपाचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी फोनवर संपर्क साधून दिला, तसेच उपोषणकर्ते व दानवे यांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उसाचा रस घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. स्वीकृतवरून सुरू झालेले भाजपमधील बंड सध्या तरी थंड झाले आहे.

वरिष्ठ नेत्यांनी घातले लक्ष
भाजपातील हुकुमशाहीबाबत कार्यकर्त्यांनी टीका केली होती. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे, असा आरोपही केला जात होता. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातले.

Web Title: The BJP continues to shake off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा