भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद धोक्यात, समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 04:38 AM2017-08-23T04:38:54+5:302017-08-23T04:38:58+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड निवडून आले. मात्र, बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड निवडून आले. मात्र, बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे. त्यामुळे गायकवाड यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश समितीने दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. या निवडणुकीत गायकवाड यांनी चिखली प्रभाग क्रमांक एकमधून भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. तसेच विजयीही झाले होते. गायकवाड यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली होती. त्यावर बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. दरम्यान, प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत २२ आॅगस्टला संपणार
असल्याने गायकवाड यांनी उच्च न्यायालयाकडून एक सप्टेंबरपर्यंत आणखी कागदपत्रे दाखल करण्याची संधी मिळविली आहे.
गुन्हा दाखल होणार
राखीव प्रवर्गातून मिळणारे फायदे तत्काळ रद्द करावेत. खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गायकवाड यांच्याविरोधात दक्षता पथकाच्या पोलीस निरीक्षकाने कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे पद रद्द होण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होणार आहे.