भाजप नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांच्या आदेशाला कोलदांडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 05:32 PM2020-02-27T17:32:55+5:302020-02-27T17:35:02+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही असा आदेश काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आदेश दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत गोंधळाचा फायदा घेत सहा विषयांच्या उपसूचना घुसडल्या.
पिंपरी : महापालिका किंवा स्थायी समितीत कोणत्याही उपसूचना घेऊ नयेत, असा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश असतानाच भाजपाने प्रदेशाध्यक्षाच्या आदेशाला कोलदांडा घालत सहा उपसूचना मंजूर केल्या आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही असा आदेश काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आदेश दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत गोंधळाचा फायदा घेत सहा विषयांच्या उपसूचना घुसडल्या. त्यातील काही उपसूचना आर्थिक असून त्याचे वाचन देखील केले नाही. तसेच गोंधळात सभेचे कामकाज उरकत अवघ्या तीन मिनिटात सतरा विषय मंजूर केल्या आहेत.
महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर उपसूचनांचा पाऊस सर्वसाधारण सभेत पडत होतात. विसंगत उपसूचना देण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच पक्षातीलच सदस्यांना उपसूचना माहित होत नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्षाकडे केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेतील कोणत्याही सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही, असा आदेश भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिला होता. प्रदेशाध्यक्षांच्या आदेश डावलून आजच्या सभेत उपसूचना स्वीकारल्या असून त्यात आर्थिक उपसूचनांचाही समावेश आहे.तीन मिनिटात सभा उरकली.
सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास आपटून निषेध केला. त्यावर सत्ताधाºयांनी गोधंळ घातला गोंधळातच भाजपने सभेचे कामकाज रेटून नेले. अवघ्या तीन मिनिटांत विषयपत्रिकेवरील सतरा विषयांना मान्यता दिली. कोणताही विषय वाचला नाही, ना कोणी अनुमोदन दिले. तशीच विषयांना मान्यता दिली. तर, गोंधळाचा फायदा घेत उपसूचना देखील घुसडल्या. एकाही उपसुचनांचे देखील कोणी वाचन केले नाही. याबाबत विरोधकांनी टीका केली आहे. माजी विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘सत्ताधारी भाजपाचे नेते सभाशास्त्रानुसार कामकाज करीत नाहीत. तसेच नेत्यांच्या आदेशालाही कोलदांडा घालतात. उपसूचना घ्यायच्या नाहीत, असे आदेश असताना त्या स्विकारल्या. उपसूचनांचे वाचन झाले नाही. ही बाब चुकीची आहे.’’