प्रभाग समित्यांवर भाजपाचे वर्चस्व?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:03 AM2017-08-04T03:03:43+5:302017-08-04T03:03:50+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा प्रभागांमध्ये क्रांतिदिनापासून दोन क्षेत्रीय कार्यालयांची भर पडणार आहे. एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये असणार असून ही रचना करताना भाजपाने आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहील आणि...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा प्रभागांमध्ये क्रांतिदिनापासून दोन क्षेत्रीय कार्यालयांची भर पडणार आहे. एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये असणार असून ही रचना करताना भाजपाने आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहील आणि प्रभाग अध्यक्ष भाजपाचाच होईल या दृष्टीने दक्षता घेतली आहे. येत्या बुधवारी (दि. ९) होणाºया आठही प्रभाग समिती अध्यक्षपदी सत्ताधाºयांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात यापूर्वी सहा क्षेत्रीय कार्यालय होते. लोकसंख्या वाढ आणि नवीन प्रभागरचना झाल्यानंतर दोन क्षेत्रीय कार्यालये वाढवण्यासाठी सत्ताधाºयांनी जोर लावला होता. त्यानुसार दोन क्षेत्रीय कार्यालयांची रचना करण्यात आली आहेत. येत्या क्रांतिदिनापासूनच दोन कार्यालये सुरू होणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना भाजपाने धूर्तपणाचे दर्शन घडविले आहे. महापालिके पाठोपाठ सर्व प्रभाग कार्यालये स्वत:कडे राहावीत, या दृष्टीने व्यूहरचना केल्याचे दिसून येत आहे.
अ प्रभागात भाजपाचे नऊ नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. ‘ब’ प्रभागात भाजपाचे आठ, राष्ट्रवादीचे सहा आणि शिवसेना एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. ‘क’ प्रभागात भाजपाचे अकरा, राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक आहेत. ‘ड’ प्रभागात भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. ‘फ’ प्रभागात भाजपाचे आठ, राष्ट्रवादीचे सहा आणि मनसे एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. ‘ग’ प्रभागात भाजपाचे नऊ, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना दोन आणि अपक्ष दोन नगरसेवक आहेत. ‘ह’ प्रभागात भाजपाचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा व अपक्ष एक नगरसेवक आहे.
‘त्या’ ठिकाणी अपक्षांची मदत
आठही ही प्रभागांमध्ये भाजपाचे बहुमत असणार आहे. तसेच ज्या ठिकाणी संख्यात्मकदृष्ट्या संख्या कमी आहे तिथे अपक्षांचीही मदत घेतली आहे. त्यामुळे आठही समित्यांवर भाजपाचे अध्यक्ष निवडून येऊ शकतात. दरम्यान, स्थायी समिती, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा समितीवर वर्णी न लागलेल्या नगरसेवकांनी प्रभाग अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे नगरसेवक प्रभाग समितीचे अध्यक्ष पद मिळविण्यासाठी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे या नेत्यांकडे मागणी करीत आहेत. कोणतेही पद न मिळालेल्या नगरसेवकांना प्रभागाध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.