महायुतीतील घटक पक्ष ज्यांच्या जागा तेच लढविणार- चंद्रशेखर बावनकुळे
By विश्वास मोरे | Published: October 11, 2023 10:39 PM2023-10-11T22:39:54+5:302023-10-11T22:41:10+5:30
लोकसभेच्या जागांबाबत ११ पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय
विश्वास मोरे, पिंपरी : महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा आणण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. ज्यांच्या ज्या जागा आहेत, तेच लढविणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह ११ पक्ष एकत्रिपणे येऊन लोकसभेच्या जागांबाबत चर्चा केली जाणार आहे, आम्ही एकजूटीने निवडणूक लढविणार आहोत, जिंकणार आहोत, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळेवाडीत व्यक्त केला.
भाजपाच्या वतीने घरचलो अभियान आणि युवा वॉरीयर्स संवादासाठी बावनकुळे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. अभियानाविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ‘‘भाजपाच्या वतीने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कामांचा माहिती दिली जाणार आहे. अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती म्हणून जनतेसमोर जायचे आहे. लोकसभेची कोणती जागा कोण लढवेल. याची चर्चा आताच करणे योग्य नाही. महायुतीतील घटक पक्षांच्या ज्या-ज्या जागा असतील तेच लढविणार आहेत. भाजपाची जी जागा आहे तिथे भाजपा, राष्टÑवादीची आहे, तिथे घड्याळ आणि जी शिवसेनेची आहे. तिथे धनुष्यबान चिन्हांवर निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींचे हात मजबूत करण्यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे. आता कोण कोणती जागा लढविणार यापेक्षा ४५ खासदार निवडूण आणायचे हाच महायुतीचा संकल्प आहे.’’
आमदार आहेत, डावलण्याचा प्रश्नच येत नाही!
आमदार अश्विनी जगताप यांनी प्रॉटोकॉल पाळला जात नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बावनकुळे यांना विचारले. बावनकुळे म्हणाले, ‘मी या प्रकाराची माहिती घेतली. आमदारांच्या विधानाचा विपर्यास केला आहे. त्या लोकप्रतिनिधी आहेत. पक्षात संघटना आणि लोकप्रतिनिधी या दोघांचेही महत्व आहे. त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधींना डावलणार नाही.’’
बारामतीत महायुतीच विजयी होणार!
बारामती लोकसभेची जागा कोणास, कोण उमेदवार असेल? याप्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ‘‘बारामतीतून महायुतीच विजयी होणार, महायुतीचाच उमेदवार असेल."