संभाजीनगरच्या आरक्षित भूखंडावरून भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 12:24 AM2019-01-08T00:24:55+5:302019-01-08T00:25:06+5:30
संभाजीनगर येथील बसस्थानकासाठी आरक्षित भूखंडाच्या भिंतीची तोडफोड करून विनापरवाना फूड फेस्टिव्हल आणि आठवडा बाजार भरविला जात आहे.
पिंपरी : संभाजीनगर येथील बसस्थानकासाठी आरक्षित भूखंडावर भाजपा नगरसेवक तुषार हिंगे यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी सीमाभिंतीची तोडफोड केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या व माजी महापौर मंगला कदम यांनी केला. त्यावर मी कोणत्याही प्रकारची सीमा भिंत तोडली नाही. अतिक्रमण केले नाही, परवानगी घेऊनच कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असे प्रत्युत्तर तुषार हिंगे यांनी दिले आहे.
संभाजीनगर येथील बसस्थानकासाठी आरक्षित भूखंडाच्या भिंतीची तोडफोड करून विनापरवाना फूड फेस्टिव्हल आणि आठवडा बाजार भरविला जात आहे. सीमाभिंत तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी महापौर कदम यांनी आयुक्तांकडे केली आहे.
कार्यक्रम आयोजनावरून वाद : सीमाभिंत तोडल्याचा आरोप
मंगला कदम यांची तक्रार मिळाली आहे. सीमाभिंत तोडल्याच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आधिका-यांना दिले आहेत.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त
आम्ही सीमाभिंत तोडलेली नाही : तुषार हिंगे
४महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून तीन दिवसांसाठी भूखंड वापराची परवानगी घेतली आहे. २४ डिसेंबरला क्षेत्रीय अधिकाºयांना पत्र दिले होते. उद्यापासून होणाºया फूड फेस्टिव्हलला अधिकृत परवानगी घेतली आहे. परवानगी घेऊनच फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरविण्यात येत आहे. कोणती सीमाभिंत तोडली, याचे पुरावे द्यावेत. आम्ही कोणतीही भिंत तोडली नाही. सीमाभिंत कोणी तोडली याची आपल्याला माहिती नाही. अतिक्रमणही केले नाही. मला आणि भाजपाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.
नगरसेवक व अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करा : मंगला कदम
एमआयडीसी जी ब्लॉक येथील एचडीएफसी कॉलनीसमोर महापालिकेचा भूखंड आहे. बस टर्मिनलसाठी हा भूखंड आरक्षित आहे. मोक्याच्या ठिकाणचा हा भूखंड बळकाविण्यासाठी भाजपा नगरसेवकांने फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरविला आहे. हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक सुपेकर यांनी संगनमताने भूखंडाची सीमाभिंत तोडून जागेचे सपाटीकरण केले आहे. बस टर्मिनलचा भूखंड हस्तांतरित करताना महापालिकेने एमआयडीसीकडे कोट्यवधी रुपयांचे विकसनशुल्क भरले आहे. भूखंडावर अतिक्रमण होऊ नये याकरिता लाखो रुपये खर्च करुन सीमाभिंत बांधली आहे. परंतु, संरक्षणभिंत तोडून भूखंड बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोघांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा आंदोलनाचा इशारा मंगला कदम यांनी दिला आहे.