भाजपातील गटबाजीमुळे महापौरपदासाठी चढाओढ; भोसरी अन् चिंचवड मतदारसंघाच्या आमदार समर्थकांमध्ये चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 04:47 AM2018-07-31T04:47:32+5:302018-07-31T04:47:43+5:30

महापौरपदासाठी चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. मूळ ओबीसींना संधी द्या, या मागणीबरोबरच आता माळी, लेवा पाटीदार व कुणबी समाजाला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 BJP staged a bout for the post of Mayor; Supporters of Bhosari and Chinchwad constituencies | भाजपातील गटबाजीमुळे महापौरपदासाठी चढाओढ; भोसरी अन् चिंचवड मतदारसंघाच्या आमदार समर्थकांमध्ये चुरस

भाजपातील गटबाजीमुळे महापौरपदासाठी चढाओढ; भोसरी अन् चिंचवड मतदारसंघाच्या आमदार समर्थकांमध्ये चुरस

Next

पिंपरी : महापौरपदासाठी चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. मूळ ओबीसींना संधी द्या, या मागणीबरोबरच आता माळी, लेवा पाटीदार व कुणबी समाजाला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. महापौरपदासाठी इच्छुकांनी जातीचे कार्ड बाहेर काढले आहे. अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (दि. ३१) असून, दुपारी चारपर्यंत कोण महापौर होणार हे निश्चित होईल. गटबाजीमुळे महापौरपदासाठी भाजपात चढाओढ असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आली. महापौरपद हे इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. कुणबी म्हणून निवडून आलेल्या आमदार महेश लांडगेसमर्थक नितीन काळजे यांना भाजपाचा पहिला महापौर होण्याची संधी मिळाली होती. त्या वेळीही ओबीसी संघटनेने मूळ ओबीसींना संधी द्यावी, अशी मागणी केली होती. सव्वावर्षाच्या मुदतीनंतर महापौर, उपमहापौरांनी राजीनामा देताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. सुरुवातीला महापौरपदासाठी मूळ ओबीसीला संधी द्यावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. त्यानंतर माळी समाजाने महापौरपदी पुरुष नगरसेवकाला संधी द्यावी, अशी मागणी केली.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध क्षेत्रांत काम करणारे साडेतीन लाख लोकसंख्येने खान्देशातील विविध समाजांतील नागरिक कार्यरत आहेत. खान्देशातील उद्योजक, कामगार वर्ग ४० वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. या शहराच्या वैभवात आणि विकासात त्यांचाही खारीचा वाटा आहे. त्यामुळे नामदेव ढाके यांना संधी द्यावी, अशीही मागणी होत आहे.
इतर मागासवर्गीय प्रवर्गार्तील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी नेत्यांनी आपल्या समर्थकांना संधी देण्यासाठी मुंबईत ठिय्या मारला आहे. या पदासाठी भोसरीतून आमदार महेश लांडगेसमर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे; तर चिंचवडमधून
आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, तसेच भाजपाचे निष्ठावान नामदेव ढाके इच्छुक आहेत.

जातीची समीकरणे
कुणबी म्हणून निवडून आलेल्या पिंपळे गुरव येथील नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापौरपदाची संधी देण्याची मागणी केली आहे. पक्षश्रेष्ठींनी लॉबिंग चालत नसल्याचे सुनावले आहे. लेवा पाटीदार संघ, खान्देशातील विविध संघटनांनी भाजपाचे निष्ठावान नगरसेवक नामदेव ढाके यांना महापौर करण्याची मागणी केली आहे. तर राहुल जाधव आणि संतोष लोंढे यांनी आमदाराच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेले आहेत. जुन्या नगरसेवकांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. जाधव हे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार होते. परंतु, ऐनवेळी चिंचवड मतदारसंघातील ममता गायकवाड यांची स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागली.

दबाव तंत्राचा वापर
जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचा, तसेच महापौर काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. जाधव यांना पद मिळण्यास आपली अडचण ठरत असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्या वेळी महापौरांनी सांगितले होते. त्यामुळे आता महापौरपदासाठी जाधव यांचे नाव अग्रस्थानी राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चिंचवडधील काटे हे मराठा - कुणबी असल्याने त्यांच्या नावास इतर मागासवर्गीयांचा विरोध आहे. अर्ज भरण्यास काही तास शिल्लक असल्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. मंगळवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. भाजपा कोणाला संधी देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, उपमहापौर या पदासाठी फार कोणी उत्सुक असल्याचे दिसून येत नाही.

Web Title:  BJP staged a bout for the post of Mayor; Supporters of Bhosari and Chinchwad constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.