भाजपा कार्यकर्त्यांना पद नको; सन्मान द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:44 AM2017-08-12T02:44:26+5:302017-08-12T02:44:26+5:30
पिंपरी-चिंचवड शहर भाजपााच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येत नसून, त्यांना हिणवण्यात येत आहे. सामान्य कार्यकर्ताच भाजपाचा चेहरा आहे; मात्र भाजपाचे महापालिकेतील सत्ताधारी, काही पदाधिकारी अशा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महापालिकेचा कारभार करीत आहेत. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराला तिलांजली देत आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपााच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येत नसून, त्यांना हिणवण्यात येत आहे. सामान्य कार्यकर्ताच भाजपाचा चेहरा आहे; मात्र भाजपाचे महापालिकेतील सत्ताधारी, काही पदाधिकारी अशा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महापालिकेचा कारभार करीत आहेत. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराला तिलांजली देत आहेत. अशा बेमुर्वत आणि बेजबाबदार पदाधिकाºयांना आवरा. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नसून, केवळ सन्मान द्यावा, अशी विनंती भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात थोरात म्हणाले, ‘‘पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा अजेंडा घेऊन भाजपाने गल्ली ते दिल्लीपर्यंतची सत्ता मिळविली आहे. ठोस आणि दूरदृष्टी ठेवून विकासकामे करण्यावर भाजपाचा भर आहे. पदाधिकाºयांनीदेखील या शैलीनुसारच कार्यरत राहावे, असे सूचित केले आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळण्याला पंतप्रधानांनी प्राधान्य दिले आहे.
महापालिकेतील भाजपातील सत्ताधारी पदाधिकारी मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. शहरवासीयांच्या पैशांच्या विनियोग यथायोग्य आणि दूरदृष्टीने होणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीच्या कार्यशैलीप्रमाणे कारभार सुरू असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे भाजपाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महापालिकेचा कारभार अंदाधुंदपणे सुरू आहे. याचा परिणाम भाजपाच्या जनमानसातील प्रतिमेवर होणार आहे.
निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाचा आराखडाही राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झाला आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या दुसºया टप्प्यात मेट्रोचा मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत विस्तारण्यात येणार आहे; मात्र या मेट्रोच्या मार्गाबाबत ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या आराखड्यात कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. मेट्रो गृहीत धरून ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा तयार केलेला नाही. परिणामी मेट्रो प्रकल्पाला अडथळा होऊ शकतो. त्यामुळे उड्डाणपुलाचा आराखडा नव्याने तयार करावा. नियोजित मेट्रो आणि तत्सम प्रकल्पांचे नियोजन करावे. तसेच या नवीन आराखड्याला महामेट्रो व्यवस्थापनाकडून मंजुरी घ्यावी.’’