महेश लांडगेंनी शब्द न पाळल्याने भाजपच्या शहर संघटकाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:23 AM2022-04-22T11:23:36+5:302022-04-22T11:26:46+5:30
पिंपरी-चिंचवड शहर भाजपला धक्का
पिंपरी : भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे (mahesh landage) यांनी दिलेला शब्द न पाळल्याने नाराज होऊन एका पदाधिकाऱ्याने सहकार आघाडी ‘शहर संघटक’ पदाचा राजीनामा दिला आहे. महेश लांडगे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अतिदुर्गम व आदिवासी भागात राहणाऱ्या निराधार, विधवा महिलेच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही त्यांनी मदत न केल्याने मी राजीनामा देत आहे, असे शहर संघटक शिवकुमार बायस (shivkumar bayas) यांनी म्हटले आहे.
कांताबाई तवंर या निराधार, विधवा महिलेचे घर मागील वर्षी अतिवृष्टीने पडले. या महिलेच्या स्वप्नातील घर पूर्ण करण्याची जबाबदारी संघटनेने पूर्णतः स्वीकारली होती. संघटनेच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांच्याकडे गेल्या चार महिन्यांपासून निधीबाबत पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून दिलेला शब्द पाळला जात नाही. कसलीही मदत न केल्याने संघटनेचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे, अशी भूमिका शिवकुमार बायस यांनी व्यक्त केली.
शिवकुमार बायस यांनी राजीनामा माझ्याकडे दिलेला नाही. असा काही प्रकार माझ्यापर्यंत आला नाही. त्यामुळे या संदर्भात मला कसलीही कल्पना नाही.
- महेश लांडगे, शहराध्यक्ष, भाजप.