भाजपाची सलग चौथ्यांदा सरशी
By admin | Published: February 24, 2017 02:45 AM2017-02-24T02:45:18+5:302017-02-24T02:45:18+5:30
पश्चिम महाराष्ट्राचे घाटमाथ्यावरील प्रवेशद्वार असलेल्या मावळ तालुक्यात सलग चौथ्यांदा विजय मिळवत भारतीय
लोणावळा : पश्चिम महाराष्ट्राचे घाटमाथ्यावरील प्रवेशद्वार असलेल्या मावळ तालुक्यात सलग चौथ्यांदा विजय मिळवत भारतीय जनता पक्षाची तालुक्यावरील पकड कायम राखली. पंचायत समितीच्या सहा जागा जिंकत भाजपाने बहुमताने सत्ता मिळवली. बंडखोरी झाल्यानंतरही राष्ट्रवादीने चार जागांवर विजय मिळवत मागील पंचवार्षिक काळापेक्षा चांगली कामगिरी बजावली.
शिवसेनेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला. अपक्षांनादेखील पंचायत समितीमध्ये शिरकाव करता आला नाही. जिल्हा परिषदेची एक जागा मात्र या वेळी भाजपाला गमवावी लागली. मावळात भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या ताब्यातील वडगाव खडकाळा ही जागा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाबूराव वायकर यांनी जिंकली. राष्ट्रवादीने दोन जागांवर वर्चस्व कायम राखले.
मागील २५ वर्षांपैकी २० वर्षे मावळ पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आहे. या वेळीही भाजपाने सहा जागा मिळवत मावळात स्पष्ट बहुमत मिळविले. मागील २५ वर्षांपासून भाजपाचा आमदार असल्याने मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच मावळातील नाणे मावळ हा भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या वेळीही राष्ट्रवादीने नाणे मावळातील जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या तीन जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले.
मावळ तालुका हा नाणे, पवन व आंदर मावळ या तीन भागात विभागला गेला आहे. नाणे मावळाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला तर आंदर व पवन मावळात भाजपाला एकतर्फी यश मिळाले. वडगाव व खडकाळा गटाचे लोकाभिमुख अपक्ष उमेदवार वायकर यांनी मात्र विजय मिळवत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांचे चिरंजीव सुनील ढोरे व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर यांचे चिरंजीव अजित सातकर यांचा पराभव केला. नितीन मराठे, बाबूराव वायकर, कुसुम काशिकर व अलका धानिवले या जिल्हा परिषदेच्या चारही उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली व शेवटच्या फेरीपर्यंत ती कायम राखत विजय मिळविला. शोभा कदम यांनी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत निसटता विजय मिळविला.
पंचायत समितीमध्ये ज्योती शिंदे, साहेबराव कारके, गुलाबराव म्हाळसकर, सुवर्णा कुंभार, महादू उघडे, राजश्री राऊत, जिजाबाई पोटफोडे व निकिता घोटकुले यांनी विजयश्री मिळविली. राष्ट्रवादीचे दत्तात्रय शेवाळे व भाजपाचे शांताराम कदम यांनी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत निसटता विजय मिळविला. (वार्ताहर)
घड्याळाऐवजी धनुष्यमुक्त झाला मावळ
मावळ तालुका घड्याळमुक्त करण्याचा चंग आमदार बाळा भेगडे यांनी बांधला होता. मात्र, निवडणुकांच्या काळात शिवसेना व भाजपा यांची युती राज्यात सर्वत्र तुटल्याने मावळातही स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. यामध्ये भाजपाने सहा व राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्याने शिवसेनेला नाणे मावळातील वाकसई पंचायत समितीची एकुलती जागादेखील गमवावी लागली. त्यामुळे मावळ घड्याळमुक्त होण्याऐवजी धनुष्यबाणमुक्त झाल्याची चर्चा होती. काँग्रेसलादेखील मावळात सर्व जागांवर पराभवाला सामोरे लागले लागले.
आमदारांचा लाल दिव्याचा मार्ग मोकळा?
पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता आल्यास आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे यांना लाल दिवा देऊ, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये मावळवासीयांना पंचायत समिती इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी दिले होते. मावळात आता भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. लोणावळा व तळेगाव नगर परिषदेची सत्तादेखील भाजपाच्या ताब्यात आली असल्याने आमदार भेगडे यांचा लाल दिव्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जाते. भाजपाने आमदार भेगडे यांच्या रूपाने मावळाला लाल दिवा देत न्याय द्यावा, अशी भावनाही मावळवासीय व्यक्त करत आहेत.