‘राष्ट्रवादी’ फोडण्याचा भाजपाचा मनसुबा

By Admin | Published: December 4, 2015 02:43 AM2015-12-04T02:43:29+5:302015-12-04T02:43:29+5:30

महापालिकेत एकमुखी सत्ता असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्याच्या उद्देशाने पक्ष फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मनसुबे आखले आहेत. भोसरीचे विद्यमान

BJP's Manasuba to break 'Nationalist' | ‘राष्ट्रवादी’ फोडण्याचा भाजपाचा मनसुबा

‘राष्ट्रवादी’ फोडण्याचा भाजपाचा मनसुबा

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेत एकमुखी सत्ता असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्याच्या उद्देशाने पक्ष फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मनसुबे आखले आहेत. भोसरीचे विद्यमान अपक्ष आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांना भाजपात घेण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीतील माजी महापौर आझम पानसरे यांनी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आहे.
केंद्र व राज्यात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे उद्योगनगरीतील आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांना शह देण्यासाठी अमर साबळे यांना राज्यसभा आणि सचिन पटवर्धन यांना कॅबिनेटचा दर्जा असलेले पद देण्यात आले आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, नितीन गडकरी यांनीही लक्ष घातले आहे.
विलास लांडे व महेश लांडगे यांच्यापैकी कोणास पक्षात घेऊन पद द्यायचे, याबाबत संघ आणि स्थानिक भाजपाचे नेते यांच्यात चर्चा सुरू आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात ‘संघा’च्यातर्फे सर्वेक्षणही होणार आहे. (प्रतिनिधी)

विधान परिषदेची तयारी
नोव्हेंबर २०१६ मध्ये पुण्यासाठी असणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेची मुदत संपत आहे. पुणे परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्राबल्य आहे. या जागेसाठी माजी महापौर आझम पानसरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. विधान परिषदेच्या या जागेवर राष्ट्रवादीकडून कोणास संधी द्यायची, याबाबत नेत्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. ही जागा पूर्ण ताकदीनिशी लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादीतील नाराजांवर जाळे...
गटातटांच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीत नाराजांची संख्या अधिक आहे. पक्षातील गटबाजीचा फटका बसल्याने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, पिंपरीतील माजी आमदार अण्णा बनसोडे हे प्रचंड नाराज आहेत. तर, राष्ट्रवादीने आमदारकीची उमेदवारी नाकारली असताना स्वबळावर निवडून आलेले महेश लांडगे कोणाबरोबर जाणार, याबाबत उत्सुकता आहे. लांडे आणि लांडगे यांच्यापैकी कोणाला पक्षात घ्यायचे, या दृष्टीने भाजपात विचारमंथन सुरू आहे. या नाराजांना भाजपात घेण्यासाठी संघनीतीचाही वापर केला जात आहे. दोघेही पहिले कोण, याच्या प्रतीक्षेत आहेत.

भोसरी परिसरातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला काम करण्याची संधी दिली. त्यांच्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
- महेश लांडगे, आमदार

राजकारण म्हटले की, चर्चा होतच असतात. त्या चर्चांचे मलाही आश्चर्य वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसने मला भरपूर दिले आहे. त्यामुळे तूर्त तरी मी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
- विलास लांडे, माजी आमदार

Web Title: BJP's Manasuba to break 'Nationalist'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.