पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या 'मास्टरप्लॅन'ने विरोधकांच्या आंदोलनाचा उडाला फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 08:25 PM2021-02-22T20:25:03+5:302021-02-22T20:25:16+5:30
मागील आठवड्यातील गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवरील अपक्ष सदस्य निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी गोंधळ घातला होता...
पिंपरी : कोरोना आणि स्थायी समितीवर अपक्ष म्हणून निवड केलेल्या सदस्य निवडीवरून विरोधक कोंडीत पकडणार असल्याची चाहुल लागल्याने कोणतेही कारण न देता सत्ताधारी भाजपाने महापालिकेची सभा तहकूब केली. आंदोलनाच्या तयारीने आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा फज्जा उडाला.
मागील आठवड्यातील गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवरील अपक्ष सदस्य निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी नियुक्तीस मंजुरी देऊन महापौरांनी सभा सोमवारपर्यंत तहकूब केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सभा सोमवारी झाली. सभेची वेळ दोनची असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहाबाहेरच होते. तर सभेला बोटावर मोजण्याइतके सभासद सभागृहात हजर होते. त्यामुळे आंदोलनाची कुणकूण लागलेल्या सत्ताधारी पक्षाने सभेचे कामकाज सुरू केले. याचवेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सभेच्या सुरुवातीलाच सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला भाजपचे विकास डोळस यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नऊ मार्चपर्यंत तहकूब केल्याचे महापौर उषा ढोरे यांनी जाहीर केले.
..................
टायमिंग चुकले
कोवीड बीले आणि अपक्ष निवडीवरून विरोधी पक्ष आंदोलन करणार होता. याच्या तयारीसाठी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह नगरसेवक विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात होते. भाजप हटाव, महापालिका बचाव असे शर्ट परिधान करून विरोधीपक्षाचे सदस्य दोन वाजून दहा मिनिटांनी सभागृहात आले. त्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचा आंदोलनाचा डाव फसला.
............................
कोणतेही सबळ कारण न देता ही सभा पुढे ढकलली आहे. सर्वसाधारण सभेत शहराचे प्रश्न, समस्या आणि गरजा सदस्य मांडत असतात. मात्र सत्ताधारी त्यांचे अंतर्गत राजकारण आणि त्यांच्या सोयीनुसार महापालिका सभेकडे पाहत आहे. गुरुवारी सदस्यांनी गोंधळ घातला म्हणून सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधाºयांनी त्यांच्या सोयीसाठीच आजची सभा तहकूब केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
...................
महापालिकेची स्थायी समितीची विशेष सभा अडीच वाजता होती. तर महापौर उषा ढोरे यांचे काही खासगी कार्यक्रम आहेत. त्यामुळे वेळेनुसार सभेचे कामकाज सुरू केले होते. महापौरांनी नऊ मार्चपर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब केली आहे.
नामदेव ढाके (सत्तारुढ पक्षनेते )