पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नितीन लांडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 17:59 IST2021-03-02T17:58:17+5:302021-03-02T17:59:16+5:30
स्थायीवर भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी समितीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नितीन लांडगे
पिंपरी: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून नगरसेवक नितीन लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अर्ज मंगळवारी (दि. २) दाखल करण्यात आला आहे. स्थायीवर भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी समितीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायीच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी भाजपमधील चिंचवड मतदार संघ आणि भोसरी मतदार संघातील गटांमध्ये चूरस निर्माण झाली होती. अध्यक्ष पदासाठी नितीन लांडगे, रवी लांडगे, शत्रुघ्न काटे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर नितीन लांडगे यांचा अर्ज दाखल करून घेण्यात आला. त्यासाठी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी सूचना मांडली तर, अपक्ष आघाडीच्या नगरसेविका निता पाडाळे यांनी अनुमोदन दिले आहे.
नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी सदस्यपदाचा राजीनामा
स्थानिक आणि पक्षातील जेष्ठ नेते आणि आमदारांनी अन्याय केल्याने भाजपाचे निष्ठावान नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. निष्ठावान असतानाही पक्षाने अन्याय केल्याने राजीनामा देत आहेत, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली आहे.
राष्ट्रवादीतर्फे प्रवीण भालेकर यांचा अर्ज दाखल
पिंपरी महापालिकेच्या चेअरमनपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ,राजू बनसोडे, राहुल कलाटे,पक्षनेते संजोग वाघिरे इत्यादी उपस्थित होते.