भाजपाच्या सहा नगरसेवकांचे पद धोक्यात, जात पडताळणी प्रमाणपत्र : २२ आॅगस्टला मुदत संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:52 AM2017-08-21T03:52:26+5:302017-08-21T03:52:26+5:30
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही. दाखला जमा करण्यासाठी २२ आॅगस्ट ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे दोनच दिवस शिल्लक राहिले असून त्या मुदतीत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. या निवडणुकीत १२८ पैकी ६४ नगरसेवक राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. निवडणुकीपूर्वी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºयांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेत. यासंदर्भात निवडणूक विभागाने पत्रेही पाठविली होती. त्यानुसार जुलै महिन्यात २२ जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल जमा केला आहे. त्यामध्ये वाढ होऊन आजपर्यंत ५८ जणांनी दाखला जमा केला आहे. तर, सहा नगरसेवकांनी अद्यापही दाखला जमा केला नाही. त्यापैकी एका उमेदवाराने एक सप्टेंबरपर्यंत न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. दाखला जमा करण्यासाठी २२ आॅगस्ट ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे दाखला जमा करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
गायकवाड यांना दिलासा
बुलढाणा, औरंगाबाद, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे या जात पडताळणी समित्यांकडून या नगरसेवकांची जात प्रमाणपत्र पडताळणी दाखले महापालिकेत आलेले नाहीत. प्रमाणपत्र दाखला देण्यासाठी समित्यांना स्मरणपत्र देखील पाठविले आहे. पाच नगरसेवकांनी मुदतीच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. नगरसेवक पद रद्द झाल्यास भाजपाला मोठा
धक्का बसू शकतो. कुंदन गायकवाड यांनी उच्च न्यायालयातून जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करण्यासाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून घेतली आहे.
नगरसेवकांची अडचण वाढणार
मुदतीत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपाचे कुंदन अंबादास गायकवाड (प्रभाग एक, चिखली), यशोदा बोईनवाड (प्रभाग सहा धावडे वस्ती), कमल घोलप (प्रभाग १३, निगडी), शैलेंद्र मोरे (प्रभाग १९, आनंदनगर, दळवीनगर), मनीषा प्रमोद पवार (प्रभाग २३ थेरगाव), शशिकांत कदम (प्रभाग २९ पिंपळेगुरव) यांचे प्रमाणपत्र महापालिकेकडे आलेले नाही.