प्रभाग समित्यांसाठी भाजपाचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:34 AM2017-08-05T03:34:37+5:302017-08-05T03:34:37+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये करताना प्रत्येक प्रभागात भाजपाचा अध्यक्ष होईल याची दक्षता घेतली असून प्रभाग समिती स्वत:कडे ठेवण्यासाठी खेळी करण्याचा आटापिटा आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये करताना प्रत्येक प्रभागात भाजपाचा अध्यक्ष होईल याची दक्षता घेतली असून प्रभाग समिती स्वत:कडे ठेवण्यासाठी खेळी करण्याचा आटापिटा आहे. क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना नागरिकांचा विचार केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे, असा आरोप विरोधीपक्षनेत्यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात यापूर्वी सहा क्षेत्रीय कार्यालय होते. लोकसंख्या वाढ आणि नवीन प्रभागरचना झाल्यानंतर दोन क्षेत्रीय कार्यालये वाढवण्यासाठी सत्ताधाºयांनी जोर लावला होता. त्यानुसार दोन क्षेत्रीय कार्यालयांची रचना केली आहे. येत्या क्रांतिदिनापासूनच दोन कार्यालये सुरू होणार आहेत. एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये असणार असून ही रचना करताना भाजपाने आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहील आणि प्रभाग अध्यक्ष भाजपाचाच होईल या दृष्टीने दक्षता घेतली आहे. त्यामुळे येत्या बुधवारी होणाºया आठही प्रभाग समिती अध्यक्षपदी सत्ताधाºयांचेच वर्चस्व राहील असे चित्र आहे.
बहल म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेपासूनच आपण भाजपाचा पारदर्शी कारभार पाहत आलो आहोत. निवडणुकीनंतर आपल्याच पक्षांचे सदस्य प्रभागाध्यक्ष व्हावेत, यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांची मोडतोड केली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. भाजपाने स्वत:च्या फायद्यासाठी नागरिकांनी वेठीस धरले आहे.
पिंपरीगावचा परिसर थेरगाव क्षेत्रीय कार्यालयाला जोडला आहे. प्राधिकरणातील क्षेत्रीय कार्यालयास चिखलीचा भाग जोडला आहे. भौगोलिक सलगतेचा विचार केलेला नाही. सत्तेसाठी काहीही करण्याचे भाजपाचे धोरण आहे. अगदी विरोधकांना बसण्यासाठीही जागा मिळू न देण्याचे धोरण आखले आहे. प्रभागाची निवडणूक एकतर्फी होईल, यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे पक्षीय बहुमत त्यांचेच राहील याबाबत दक्षता घेतली आहे. अपक्षांचीही मदत घेतली आहे. मात्र, दोन प्रभागात आम्ही निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करणार आहोत.