बीआरटी मार्गात काळी गुढी
By admin | Published: March 29, 2017 02:19 AM2017-03-29T02:19:29+5:302017-03-29T02:19:29+5:30
निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग असुरक्षित, धोकादायक आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्द करावा याकडे लक्ष
पिंपरी : निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग असुरक्षित, धोकादायक आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्द करावा याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सार्वजनिक वाहतूक सुधारणा समितीने मार्गात काळी गुढी उभारून लादलेल्या बीआरटीचा निषेध केला.
या वेळी समिती समन्वयक काशिनाथ नखाते, समिती सदस्य संजय मालांडकर,अनिल बारावकर, विजय निकाळजे, इरफान चौधरी, सुरेश कोकीळ, संतोष गायकवाड, सखाराम केदार,ओमप्रकाश मोरया, नागनाथ लोंढे, संपत तिखे, सुशेन खरात, अप्पा साळवे आदी सदस्य उपस्थित होते.
अपघातात झालेल्या मृत्यू, वाहनांचे नुकसान, तसेच आलेल्या अपंगत्वास मनपा प्रशासन जबाबदार आहे. प्रवासी व नागरिक यांच्यासाठी सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि अमजद सय्यद यांनी न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय मार्ग सुरू करण्यास प्रतिबंध घातला आहे. या मार्गावरील अत्यंत धोकादायक मॅर्ज इन आणि मॅर्ज आऊट या मार्गातून बाहेरील रस्ता भेदून जात असल्याने दररोज अपघात होण्याची शक्यता आहे. प्रत्येक चौकात बॅरिगेड्स तुटलेले आहेत. बसथांबे मोडकळीस आले आहेत. या सर्व बाबींचा विचार मनपाने न केल्यास तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा या वेळी समितीच्या वतीने देण्यात आला. (प्रतिनिधी)
प्रवासी, वाहनचालक, अपंग, पादचारी यांच्या सुरक्षिततेचे कोणतेही उपाय न करता व सुरक्षा अहवाल फेटाळला, तरीही जागतिक बँक आणि तत्सम संस्था यांच्या मागणीनुसार केवळ जेएनएनयूआरएमचा निधी लाटायच्या उद्देशाने या मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी एप्रिलमध्ये हा मार्ग सुरू करण्याचे जाहीर केले आहे. हे पूर्णत: चुकीचे असून, मनपाच्या चुकांमुळे दररोज अपघात होत आहेत.