रिंग प्रकरणातील दोषींना टाकणार काळ्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:16 AM2019-02-06T01:16:42+5:302019-02-06T01:17:00+5:30
महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांतील नगरसेवकांनी केला होता. याची दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे.
पिंपरी : महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांतील नगरसेवकांनी केला होता. याची दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. निविदा कार्यवाही करून त्यात दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
पालिकेतील स्थापत्यविषयक कामांत रिंग होत असल्याचे लोकमतने वृत्तासह प्रकाशित केले होते. त्यावर प्रशासनाने खुलासा करून आता काही घडतच नाही, असे सांगितले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे आणि राष्टÑवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी रिंग बाबत प्रशासनावर आरोप केले होते. सत्ताधारी नगरसेवकांनीहल्लाबोल केल्याने सत्ताधारी अडचणीत आले होते.
संतपीठांच्या विषयावरील चर्चेत विरोधीपक्षनेते दत्त्ता साने यांनी लोकमतच्या वृत्ताचा अहवाल देत, रिंगमधील ठेकेदारांची नावे वाचून दाखविली होती. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता. आज झालेल्या स्थायी समिती सभेत यावर चर्चा झाली. याबाबत सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘रिंगचे आरोप झाल्याने पुनर्निविदा काढाव्यात, अशी सूचना शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केली होती. त्यावर दोन मते व्यक्त झाली. निविदा प्रक्रिया रद्द केल्यावर त्यासाठी कालावधी अधिक लागेल. त्यामुळे कामे खोळंबतील. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून ज्या निविदांबाबत आक्षेप नोंदविले आहेत. त्यात तथ्य आढळल्यास ठेकेदारांवर कारवाई करावी. अशा सूचना केल्या आहेत.’’