निविदा मागे घेणारे काळ्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:05 AM2018-07-20T00:05:50+5:302018-07-20T00:06:21+5:30
स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास आयत्या वेळी मान्यता देण्यात आली.
पिंपरी : महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत सहभागी होऊन ऐनवेळी माघार घेणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, असा निर्णय स्थायी समितीच्या बैेठकीत घेण्यात आला. साप्ताहिक बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास आयत्या वेळी मान्यता देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध विकासकामांसाठी निविदाप्रक्रिया राबविली जाते. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजित विकासकामांच्या निविदा काढल्या जातात. या निविदा भरताना ठेकेदाराला कोणते काम किती रुपयांमध्ये, तसेच किती कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे, याची माहिती अटी व शर्तींच्या समावेशासह असते.
स्थायी समितीने ठेकेदारांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या विकासकामांची अथवा खरेदीची निविदाप्रक्रिया पार पाडताना पहिले पाकीट फोडल्यानंतर आपण निविदेत भरलेला दर चुकीचा असल्याचे कारण देत अनेक ठेकेदार निविदा मागे घेतात. त्यामुळे या प्रक्रियेत निकोप स्पर्धा होत नसून, ठेकेदार रिंग करीत असल्याचे उघड झाले आहे. या विषयी स्थायीच्या बैठकीत चर्चा झाली.
निविदाप्रक्रियेत सहभागी ठेकेदाराला विकासकामाची, रकमेची संपूर्ण माहिती असते. तरीदेखील या ठेकेदारांकडून केवळ अन्य ठेकेदाराला पूरक परिस्थिती निर्माण करून देण्यासाठी असा प्रकार केला जातो. त्यामुळे निविदाप्रक्रियेमध्ये सहभागी होऊनदेखील पहिले पाकीट फोडल्यानंतर, चुकीचे दर भरल्याचे कारण सांगत निविदा प्रक्रियेतून माघार घेणाºया ठेकेदारांना काळ्या यादीत समावेश केला जाणार आहे. तसेच, पहिले पाकीट उघडल्यानंतर माघार घेणाºया ठेकेदाराचे दुसरे पाकीटदेखील उघडले जात नाही. असे न करता, या ठेकेदाराचे दुसरे पाकीटदेखील उघडण्यात येणार आहे, असे विलास मडेगिरी यांनी सांगितले.