ब्लॅकमेल केल्यामुळे तिने संपवली जीवनयात्रा, निगडीत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:13 AM2018-08-30T01:13:30+5:302018-08-30T01:14:03+5:30
अनैतिक संबंधांबाबतची माहिती पतीला सांगीन, असे वारंवार धमकावत तिचा मानसिक छळ केल्याने सोमवारी पवित्रा ढुंगना या नेपाळी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पिंपरी : अनैतिक संबंधांबाबतची माहिती पतीला सांगीन, असे वारंवार धमकावत तिचा मानसिक छळ केल्याने सोमवारी पवित्रा ढुंगना या नेपाळी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी करणप्रसाद ओमप्रकाश जैसी (वय १९, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकराज भूमीनंद जोशी (वय २५, रा. मल्हार रेसिडेन्सी, आकुर्डी) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी मल्हार रेसिडेन्सी येथे रखवालदार आहेत. ते मूळचे सेती अनचल, नेपाळ येथील आहेत. आत्महत्या केलेली विवाहित महिला त्यांची बहीण आहे. क्रांतीनगर, आकुर्डी येथील इंद्रप्रस्थ सोसायटीतील रखवालदार करणप्रसाद जैसी याने तिचा मानसिक छळ केला. परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे पतीला सांगणार? असे वारंवार धमकावून तो तिला ब्लॅकमेल करीत असे. हा त्रास असह्य झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या महिलेने मोबाइलमध्ये स्वत:चे संभाषण रेकॉर्ड करून ठेवले आहे. मृत्यूपूर्वी केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये तिने मुलांना ‘चांगले राहा, माझी आठवण आली, तर मावशीकडे जा’ असा संदेश दिला आहे.