अखेर साकारणार बो-हाडेवाडी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:11 AM2018-08-09T01:11:47+5:302018-08-09T01:11:56+5:30
पंतप्रधान आवास योजनेवरून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनावर रिंग केल्याचे आरोप झाले होते.
पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेवरून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनावर रिंग केल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रस्ताव मागे घेऊन फेरप्रस्ताव सादर केला. बोºहाडेवाडी येथे १ हजार २८८ घरकुले बांधण्यासाठी येणाऱ्या ११२ कोटी १९ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने विनाचर्चा मान्यता दिली. प्रकल्प बांधकामाच्या डीपीआर किमतीत बदल झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारचीही मान्यता घ्यावी लागणार आहे.
महापालिका स्थायी समितीची बुधवारी सभा झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. या सभेत ११६ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली. बोºहाडेवाडीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. १ हजार २८८ घरे बांधण्यासाठी ११० कोटी १३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानुसार एका ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २४ कोटी २३ लाख म्हणजेच १३४ कोटी ३६ लाख रुपये असा कमी दर सादर केला. मात्र, हा दरही जास्त असल्याने त्यांना सुधारित दर सादर सांगितला होता. त्यानुसार त्यांनी १२३ कोटी ७८ लाख रुपये सुधारित दर सादर केला.
दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियांमध्ये रिंग होत असल्याचा, तसेच वाढीव दराने निविदेस मंजुरी देण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला. त्यामुळे प्रशासनाची अडचण झाली होती. प्राधिकरणातर्फे पेठ क्र. १२ मध्ये गृहप्रकल्प उभारले जात आहेत. यासाठी आलेल्या निविदांच्या तुलनेत महापालिकेच्या प्रकल्पासाठी वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
>अकरा कोटींची होणार बचत
जिप्सम प्लॅस्टरसाठी होणारा ११ कोटी ३० लाख रुपये खर्च वगळून १०९ कोटी ८८ लाख रुपये दर ठेकेदाराला कळविला. त्यानुसार ठेकेदाराने ११२ कोटी १९ लाख रुपयांत काम करण्याची तयारी दर्शविली. ही सुधारित किमतीची निविदा स्वीकारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. मात्र, या बदलामुळे या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या किमतीत बदल झाला आहे. या कामास सुधारित तांत्रिक मान्यता घेण्यात येणार आहे.