नाल्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:26 AM2017-10-02T03:26:35+5:302017-10-02T03:26:39+5:30
नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम व गुलाब पुष्प उद्यानालगतच्या नाल्यात पोत्यात भरून टाकलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी दुपारी ३ च्या सुमारास आढळून आला
पिंपरी : नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम व गुलाब पुष्प उद्यानालगतच्या नाल्यात पोत्यात भरून टाकलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी दुपारी ३ च्या सुमारास आढळून आला. अंदाजे ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत खून झाला असल्याची शक्यता वर्तविली आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.
दुपारी ३ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला काही नागरिकांनी नेहरुनगरच्या घटनेची माहिती दिली. माहिती कळताच, परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मसाजी काळे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे, राजू ठुबल, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, ईश्वर जगदाळे, पवन पाटील, सागर पाटील, हरिदास बोचरे, शरद आहेर यांच्या पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने नाल्यात उतरून पोत्यातील मृतदेह बाहेर काढला. रुग्णवाहिकेतून तो उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात नेला. पोलीस आले, त्या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नाल्यालगत रहिवासी वस्ती आहे़ पोलिसांनी आजूबाजूच्या रहिवाशांकडे या घटनेबद्दल काही माहिती आहे का? याची चौकशी केली. ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला. पिंपरी पोलीस ठाणे आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या हद्दीच्या अगदी सीमेवर हा मृतदेह आढळून
आल्याने पोलिसांचा हद्दीचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र, दोन्ही पोलिसांनी एकत्रित येऊन पुढील कार्यवाही केली.
दोन महिन्यांतील आठवा खून
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ सप्टेंबरला स्वाती संजय वाघोलीकर या तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. २१ आॅगस्टला शंकर झेंडे यांचा डोक्यात प्रहार करून खून केल्याचे उघडकीस आले. निगडी येथे ही घटना घडली. आरोपींनी अपघात घडल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. दुचाकीची चावी दिली नाही म्हणून बालाजीनगर येथे २८ आॅगस्टला सतीश इंदले या तरुणाचा खून झाला. आॅगस्ट महिन्यातील खूनसत्र संपले नाही तोच सप्टेंबरच्या सुरुवातीला १२ सप्टेंबरला वाकड येथे महेश वाळवे या तरुणाचा पाचशे रुपये उसने देण्यास नकार दिला म्हणून खून करण्यात आला.
२ सप्टेंबरला आदित्य जैद या विद्यार्थ्यांचा खून झाला. काही दिवस उलटले नाही तोच १३ सप्टेंबरला सुभान शेख ऊर्फ शाबीर अमीन सोलंकी या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. २५ सप्टेंबरला विद्यानगर येथे डोक्यात दगड घालून इम्रान मुसा शेख या तरुणाचा खून झाला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राम सनेही या परप्रांतीय कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. या खून प्रकरणाने सप्टेंबर महिना संपला़ मात्र, आॅक्टोबरच्या सुरुवातीस नेहरुनगर जवळील नाल्यात महिलेचा मृतदेह मिळाला. तिचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, खून सत्र थांबणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.