Pune News| 'वर्ल्ड बेस्ट स्कूल'च्या नामांकनात बोपखेलची शाळा पहिल्या तीनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 03:55 PM2022-09-23T15:55:49+5:302022-09-23T15:59:45+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल शाळेने पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवले....
पिंपरी : इग्लंडमधील टी फॉर एज्युकेशन संस्था जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कार देते. त्यातील कम्युनिटी कोलॅबोरेशन या श्रेणीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल शाळेने पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारी महापालिकेची ती देशातील पहिली शाळा ठरली आहे. या संस्थेतर्फे अडीच लाख अमेरिकन डॉलर बक्षिस म्हणून देण्यात येणार असून, पहिल्या पाच शाळांमध्ये ते विभागून दिले जाणार आहे.
सद्यस्थितीत ही शाळा आकांक्षा फाउंडेशनला शाळा चालवायला दिली. त्यांनी इंग्रजी माध्यमातून धडे द्यायला सुरवात केली. मुलांना सर्व मूलभूत सुविधा मिळत आहेत. शिक्षक व पालकांच्या मेहनतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली. अवघ्या सहा वर्षांच्या वाटचालीत शाळेचा अर्थात 'पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल बोपखेल'चा लौकिक जागतिक पातळीवर पोहोचला.
जूनमध्ये झालेल्या पहिल्या फेरीत शाळेचे स्थान जागतिक स्तरावर प्रथम दहा शाळांमध्ये होते. त्यानंतर आता सप्टेंबर अखेरीस शाळा पहिल्या तीन मध्ये पोहचली आहे. अंतिम निकाल १९ ऑक्टोबरला लागणार असून त्या दिवशी पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट शाळांचे नावे जाहीर होणार आहेत.
शाळेची वैशिष्ट्ये....
बोपखेलमधील वाड्या, वस्त्या, झोपडपट्टीतील विद्यार्थी ज्युनिअर केजीपासून दहावीपर्यंतचे वर्ग मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, दरमहा बैठक पालक, विद्यार्थी, समाजासाठी आरोग्य जागृती शिबिरे शाळा व्यवस्थापन, विद्या, परिवहन, पोषण आहार समित्यांमध्ये पालकांचा सहभाग
या शाळा आहेत पहिल्या तीनमध्ये-
पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल, बोपखेल,
भारत डूनून ग्रामर स्कूल, आर्यलॅंड.
इमेब प्रो. अडोल्फिना जे. एम. डायफेन्थालर, ब्राझिल
स्पर्धेच्या 'कम्युनिटी "कोलॅबोरेशन' विभागात आम्ही सहभाग घेतला. पालकांसोबत आम्ही काम करतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवितो. त्यात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. शाळेत पालक व शिक्षकांचा सहभाग असतो. मुलांसमवेत पालकांची बैठक घेतो. वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. पुढील पंधरा दिवसांत काय शिकवणार, याची माहिती पालकांना दिली जाते.
- सुषमा पाठारे, मुख्याध्यापिका, पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल, बोपखेल