बोपखेलमधील मतदारांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 16:01 IST2019-04-29T15:59:58+5:302019-04-29T16:01:24+5:30
बोपखेल येथील माणिकपार्क रेसिडेन्स को ऑपरेटिव्ह सोसायटीतील रहिवाशांनी काळ्या फिती लावून मतदान केले.

बोपखेलमधील मतदारांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध
पिंपरी : बोपखेल येथील माणिकपार्क रेसिडेन्स को ऑपरेटिव्ह सोसायटीतील रहिवाशांनी काळ्या फिती लावून मतदान केले. तेथील समस्या, गैरसोयी दूर करण्याकडे कोणीही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. नागरिकांच्या समस्या जाणून न घेता केवळ मत मागण्यासाठी येणाºया राजकीय मंडळीविरूद्धचा संताप बोपखेलवासियांनी काळ्या फिती लावून व्यक्त केला. राजकारण्यांचा निषेध नोंदवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
गेल्या काही दिवसांपासून बोपखेलमधील रहिवाशांचे जीवन असह्य झाले आहे. नदीपात्रात जलपर्णी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव वाढला आहे. उन्हाळ्याचे दिवस, उकाडा वाढला आहे, त्यातच वीज पुरवठा खंडित होत आहे. डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले असून त्यावर उपाययोजना करण्यास कोणीही पुढाकार घेतला नाही. समस्या दिवसेंदिवस बिकट झाली आहे. त्यामुळे माणिक पार्कमधील रहिवाशांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत मतदान केले.