दोन्ही परीक्षा एकाच वेळी; UPSC ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वेळ
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 17, 2023 02:09 PM2023-05-17T14:09:07+5:302023-05-17T14:09:46+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील १६ पदांच्या ३८७ जागांसाठी ८५ हजार उमेदवारांचे अर्ज
पिंपरी : राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील १६ पदांच्या ३८७ जागांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यासाठी मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ तारखेला ही परीक्षा होणार आहे. मात्र, ‘यूपीएससी’च्या परीक्षा याच काळात येत असल्याने त्या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत आहे. राज्य सरकारने जून महिन्यामध्ये नोकर भरतीवरील निर्बंध उठवले. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी वैद्यकीय विभागातील स्टाफ नर्स, एएनएमसह इतर तांत्रिक अशा १३१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, नर्स भरती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील ३८७ रिक्त जागांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
१८ तारखेपासून हॉल तिकीट मिळणार...
उमेदवारांना १० मेनंतर परीक्षेसाठी हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार होते. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तारीख त्या दरम्यान आली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देणार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे सोडून बाकीच्यांचे हॉलतिकीट १८ मेपासून डाउनलोड करता येणार आहेत. त्यावरच परीक्षेचे केंद्र कळणार आहेत.
''केंद्रीय लोकसेवा आयोगाची आणि महापालिका भरतीची तारीख एकच आली आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ही परीक्षा कोणत्या केंद्रांवर होणार याबाबत उमेदवारांना १८ तारखेनंतर समजेल. तसेच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेण्यात येणार आहे. - विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.''