बनावट नोटा चलनात आणणारे दोघे जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:16 AM2018-09-12T01:16:39+5:302018-09-12T01:16:47+5:30
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली.
पिंपरी : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक करून खडकी न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोडी येथे फळविक्रेत्याला पाचशेची नोट दिली. ५० रुपयांची फळे विकत घेऊन ४५० रुपये परत मागितले. फळविक्रेता सुटे पैसे घेण्यासाठी आजूबाजूच्या दुकानदारांकडे पाचशेची नोट घेऊन गेला. मात्र नोट बनावट असल्याचा संशय येताच त्यांनी सुटे पैसे देण्यास नकार दिला. त्या वेळी नोट बनावट असल्याचे फळ विक्रेत्याच्या लक्षात आले. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली.
भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींना बनावट नोटांसह ताब्यात
घेतले. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा असे तीन हजार रुपये जप्त केले. बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट शहरात कार्यरत असावे, असा पोलिसांचा अंदाज असून, अटक केलेल्या आरोपींकडून चौकशीत आणखी काही आरोपी हाती लागतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी. बी. खारगे अधिक तपास करीत आहेत.