रावण साम्राज्य टोळीतील दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:49 AM2019-03-14T02:49:04+5:302019-03-14T02:49:18+5:30
गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई; शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात गोळीबार करून झाले होते पसार
पिंपरी : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात गोळीबार करणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन राजू चंढालिया (वय २०, रा. रावेत) आणि अशोक उत्तरेश्वर कसबे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्याआरोपींची नावे आहेत ७ मार्च २०१९ रोजी सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (रा. विकासनगर, देहूरोड) त्याच्या मित्रांसह शिवाजीनगर न्यायालय येथे गेला असताना न्यायालयाच्या आवारात त्याच्यावर रावण साम्राज्य टोळीतील रोहन चंढालिया, अक्षय साबळे व त्यांचा एक साथीदार यांनी दुचाकीवरून येऊन शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार करून पसार झाले होते. त्याबाबत पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोक्कामध्ये फरार असलेला रावण साम्राज्य टोळीतील विनोद गायकवाड आणि त्याचे साथीदार यांना दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यामध्ये वाकड पोलिसांकडून अटक झाली होती. त्या गुन्ह्यामध्ये हनम्या शिंदे यांच्या टोळीचा सदस्य सूरज वाघमारे साक्षीदार होता. त्यामुळे ७ मार्च २०१९ रोजी सूरज वाघमारे दरोड्याच्या गुन्ह्याबाबत त्याच्या १५ ते २० साथीदारांसह शिवाजीनगर येथील न्यायालयात गेला होता. त्याचवेळी रावण साम्राज्य टोळीतील मोक्का आणि दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यामध्ये फरार असलेला अक्षय साबळे व रोहन चंढालिया, अशोक कसबे हे देखील दुचाकीवरून न्यायालय परिसरात आले होते. त्या वेळी अक्षय साबळे याने सूरज वाघमारे आणि त्यांच्या साथीदारांच्या दिशेने गोळीबार केला होता.
दोघेही सराईत
दोन्ही आरोपी रावण साम्राज्य टोळीतील सदस्य असून, रोहन चंढालिया याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर निगडी, देहुरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एकूण चार गुन्हे दाखल आहेत. अशोक कसबे याच्यावर दुखापत केल्याप्रकरणी देहूरोड येथे आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी देहूरोड आणि चिखली पोलीस ठाण्यात असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.
टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद
महाकाली टोळीचा म्होरक्या राकेश ऊर्फ महाकाली ढकोलिया याचा एन्काउंटर झाल्यानंतर त्याच्या टोळीमध्ये वर्चस्वासाठी फूट पडली. टोळीच्या चकमकीत ठार झालेल्या अनिकेत जाधवने विनोद गायकवाड याला बरोबर घेऊन रावण साम्राज्य नावाने स्वत:ची टोळी तयार केली होती. तसेच हनम्या शिंदे व सोन्या काळभोर यांनी एस. के. ग्रुप नावाची स्वतंत्र टोळी तयार केली. त्या दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून वारंवार वाद होऊ लागले. सन २०१७ मध्ये रावण साम्राज्य टोळीने हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये शिंदे थोडक्यात बचावला होता. त्यानंतर शिंदे व सोन्या काळभोर यांच्या टोळीने त्याचा बदला म्हणून रावण साम्राज्य टोळीचा प्रमुख म्होरक्या अनिकेत जाधव याचा खून केला. दोन्ही टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.