पिंपरीत अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; ४२ हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:37 AM2021-06-21T10:37:02+5:302021-06-21T10:37:26+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा अमली पदार्थविरोधी पथकाने भाट नगर येथे ही कारवाई केली.
पिंपरी: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून ४२ हजार ९०० रुपये किमतीचा एक किलो ७१६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थविरोधी पथकाने भाट नगर येथे रविवारी (दि. २०) ही कारवाई केली.
प्रशांत विजय तामचीकर (वय ४६), अशोक दगडू सकट (वय ४५, दोघेही रा. भाटनगर, पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींकडून ४२ हजार ९०० रुपये किमतीचा एक किलो ७१६ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तरुण वर्गही या विळख्यात अडकू लागला आहे. नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना पोलिसांना तातडीने कळवणे गरजेचे आहे. त्यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो. असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.