हाॅटेलमधील बिलाच्या वादातून डोक्यात फोडली बिअरची बाटली; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 11:28 AM2021-01-30T11:28:02+5:302021-01-30T11:28:09+5:30
हाॅटेल मालक व तीन कामगारांनी बिअरची बाटली डोक्यात मारून एकाला जखमी केले.
पिंपरी : हाॅटेलमध्ये बिल भरण्याच्या कारणावरून वाद झाला. यात हाॅटेल मालक व तीन कामगारांनी बिअरची बाटली डोक्यात मारून एकाला जखमी केले. काळेवाडी येथील अनमोल बिअर बार रेस्टाॅरंट येथे शुक्रवारी (दि. २९) हा प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.
सुदर्शन बबन लोखंडे (वय ३८, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोनिश गोविंद शेट्टी (वय ४५, रा. पाषाण सुस रोड, पुणे), मिथुन विष्णू बिसवास (वय २८), विश्वनाथ मखन घोडाई (वय ३२), शांताराम सर्वत्तम शेट्टी (वय ६१, तिघे रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत हाॅटेलमध्ये दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी बिल भरण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यावेळी हाॅटेलमालक शेट्टी व तीन कामगारांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच बिअरची बाटली डोक्यात फोडून जखमी केले. त्यानंतर एक कामगार हातात चाकू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला.