उद्योगनगरीत हॉटेलकडून होतेय बाटलीबंद पाण्याची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:49 PM2022-11-01T13:49:58+5:302022-11-01T13:51:51+5:30
दररोज लाखो रुपयांची उलाढाल...
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ग्राहकाला पाणी दिले जाते. पण, पिंपरी-चिंचवडमधील काही हॉटेलमध्ये प्रत्येक ग्राहकाला बाटलीबंद पाण्याची सक्ती होत आहे. शहरातील दीड हजारपेक्षा जास्त हॉटेलांपैकी साधारण १ हजार हॉटेलचालकांकडून ग्लासमधून पाणी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. हॉटेलला प्रत्येक पाण्याच्या बाटलीमागे ३ ते ९ रुपयांचे कमिशन मिळते. त्यामुळे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
हॉटेल परवानापत्र देताना अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक अटी घातल्या जातात. त्यात पाणी द्यावे ही अट नाहीच. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन खातेही या प्रकाराकडे लक्ष द्यायला तयार नाही. जेवण, नाश्ता, चहा सारे मनमानी दराने विकणाऱ्यांना किमान शुद्ध पाणी द्यावे, असे का वाटत नाही? त्यांना सक्ती करण्याचे धाडस अन्न प्रशासनाकडे नाही. भले पाण्याचा एक रुपया जास्त घ्या, पण पाणी शुद्ध करून द्या, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. हॉटेलचालक कोरोनातील नियमावलींचा आधार घेत सुटे पाणी देऊ नये, या नियमाकडे बोट दाखवतात. ग्राहक असंघटित असल्याने त्याला हा अन्याय सहन करावा लागतो आहे.
बाटलीची नक्की किंमत किती
शहराच्या परिसरात बाटलीबंद पाणी तयार करण्याचे उद्योग आहेत. या उद्योजकांना विचारणा केल्यानंतर एका बाटलीची किंमत ३ ते ७ रुपये पडते, असे सांगण्यात आले. या बाटलीत ५०० ते १००० एमएल पाणी असते. हॉटेलचालक त्याचे १० रुपये सांगतात. तर १ लीटर पाण्याच्या बाटलीची किंमत ही ७ ते ९ रुपयांपर्यंत असते. एवढे कसे काय विचारल्यावर स्टोअर चार्जेस, असेही सांगायला कमी करत नाहीत.
शुद्धिकरणाचा पर्याय
पिण्याचे पाणी शुद्धिकरण करून न देण्यामागच्या कारणांचा शोध घेता अनेक बाबी समोर आल्या. पाणी शुद्धिकरण करून दिले तर २० रुपये लिटरचे मिनरल कम शुद्ध पाणी कोण घेणार? त्यात प्रत्येक बाटलीमागचा नफा १० ते १२ रुपयांचा आहे. त्यावर का पाणी सोडा? हा हॉटेलवाल्यांचा धूर्तपणा आहे. ‘शुद्ध’चा आग्रह करणारे गप्पगुमान २० रुपये मोजून बाटली घेतात. इतरांनी काही बोलले तर सरळ ‘नळाचे पाणी आहे, शुद्ध आहे’, असे उत्तर दिले जाते. याविरुद्ध अन्न प्रशासनाने थेट मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
सध्या बऱ्याचशा हॉटेलमध्ये पिण्यासाठी पाणी म्हणून पाण्याच्या बाटल्या दिल्या जातात. २० रुपयांना एक बाटलीची विक्री केली जात आहे. मात्र, या पाण्याच्या शुद्धतेविषयी कोणतीच माहिती दिली जात नाही तसेच काही ठिकाणी तर बाटलीवर त्याचा काही उल्लेख नसतो. फिल्टर पाण्याची मागणी केली तर हॉटेलचालक नाही म्हणून सांगतात.
- सागर वाघ, नागरिक
मिनरल वॉटर प्यायचे की फिल्टर पाणी प्यायचे याबाबतीचा सर्वस्वी निर्णय ग्राहकांचा असतो. त्यामुळे कुठलाही हॉटेलमालक मिनरल वॉटरची सक्ती करू शकत नाही तसे कोणी करीत असेल, तर ग्राहकांना सक्ती करू नये.
- पद्मनाभ शेट्टी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन