उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: May 7, 2023 04:03 PM2023-05-07T16:03:17+5:302023-05-07T16:03:40+5:30
नागरिकांनी उच्चदाब वाहिन्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत मागणी केली मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले
पिंपरी : उच्चदाब विद्युत वाहिन्या अंडरग्राउंड करण्याची मागणी करूनही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक मुलगा गंभीर जखमी झाला. रुपीनगर, तळवडे येथे १६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.
अतुल महादेव बेळे (वय ४१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ६) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर परिसरात उच्चदाब विद्युत वाहिन्या आहेत. त्याचा परिसरातील नागरिकांना धोका होण्याची दाट शक्यता असल्याने फिर्यादी बेळे आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी आणि तोंडी निवेदन दिले होते. त्यात नागरिकांनी उच्चदाब वाहिन्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत मागणी केली होती. मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, १६ एप्रिल रोजी फिर्यादी यांचा मुलगा पतंग खेळत असताना त्याचा पतंग उच्चदाब वाहिनीवर अडकला. फिर्यादी यांचा मुलगा जुन्या केबलच्या सहाय्याने पतंग काढत असताना त्याला शॉक बसून त्याच्या अंगावरील कपडे जळून तो गंभीर जखमी झाला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने वायर पोलवर उघडी ठेवली, असे फिर्यादीत नमूद आहे.