बहिष्कार प्रकरणी अद्याप कोणासही झालेली नाही अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:46 AM2018-10-18T01:46:59+5:302018-10-18T01:47:16+5:30
पिंपरी : कौमार्यचाचणी प्रथेविरोधात आवाज उठवून, कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना फाटा देत विवाहबद्ध झालेल्या ऐश्वर्याला सोमवारी रात्री भाटनगर येथे ...
पिंपरी : कौमार्यचाचणी प्रथेविरोधात आवाज उठवून, कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना फाटा देत विवाहबद्ध झालेल्या ऐश्वर्याला सोमवारी रात्री भाटनगर येथे दांडियाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले नाही. याप्रकरणी तिने पोलिसांकडे फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध मंगळवारी सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक झाली नसून, प्रकरण संवेदनशील असल्याने सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार जाणार आहे, असे माहिती पिंपरी पोलिसांनी दिले.
भाट समाज तरुण मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवात दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवरात्रोत्सवात आईकडे आलेली ऐश्वर्या तमाईचीकर दांडियाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली. परंतु ती येताच दांडियाचा कार्यक्रम थांबविण्यात आला. तेथून ती निघून गेल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. सार्वजनिक कार्यक्रमात आपणास सहभागी करून घेतले जात नाही, हे लक्षात आल्याने ऐश्वर्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यातील कलम ३ (१) नुसार आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भूपेंद्र तमाईचीकर, अक्षय तमाईचीकर, अक्षय माछरे, विशाल तमाईचीकर, अभय भाट, धीरज तमाईचीकर, विकास मलके, आकाश राठोड (सर्व रा. भाटनगर) यांच्यावर सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक, निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.