भंगारमालाची वाहतूक धोकादायक
By Admin | Published: January 26, 2017 12:18 AM2017-01-26T00:18:32+5:302017-01-26T00:18:32+5:30
शहर परिसरात विविध ठिकाणी लघुउद्योग स्थापन झालेले आहेत. या लघुउद्योगातून मोठ्या प्रमाणात भंगार माल बाहेर पडत असतो.
चिखली : शहर परिसरात विविध ठिकाणी लघुउद्योग स्थापन झालेले आहेत. या लघुउद्योगातून मोठ्या प्रमाणात भंगार माल बाहेर पडत असतो. हा भंगार माल एका लघुउद्योगातून दुसऱ्या लघुउद्योगात वाहून नेला जातो.परंतु अशा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनातून सदर भंगार माल रस्त्यावर सांडत असतो. यात लोखंडी बर, अनुकुचीदार टोक असलेले धातूचे तुकडे, लोखंडी पत्रा यांचा समावेश असतो.
चिखली, कुदळवाडी, शेलारवस्ती, तळवडे, जोतिबानगर आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात अशा भंगार मालाची वाहतूक केली जाते. भंगार मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची अवस्था अतिशय दयनीय असते. बऱ्याच वाहनांची मागची बाजू तुटलेल्या अवस्थेत असते.
तसेच लोखंडी बारची वाहतूक बंदिस्त वाहनातून न केल्यामुळे या वाहनांतून रस्त्यावर भंगार माल सांडत असतो. यामुळे लोखंडाचे अनुकुचीदार तुकडे रस्त्यावर पडत असतात. त्यामुळे इतर वाहने पंक्चर झाल्यामुळे चालकाला मात्र विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. यामुळे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून होत असलेली वाहतूक रोखावी, तसेच लोखंडी बर अथवा भंगार मालाची वाहतूक बंदिस्त वाहनातून करावी जेणेकरून इतर प्रवासी आणि वाहनचालक
यांना विनाकारण मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड होणार नाही, अशी मागणी प्रवासी व चालक करत
आहेत. (वार्ताहर)