मावळ तहसीलदारांची खुर्चीसाठी चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:59 AM2019-02-27T01:59:07+5:302019-02-27T01:59:09+5:30
मावळच्या तहसीलदारपदी रणजित देसाई यांची नियुक्ती झाली होती.कार्यकाळ संपायला अजून अवधी असताना लोकसभेच्या निवडणुकीचे कारण दाखवून त्यांची सहायक अन्यधान्य पुरवठा अधिकारी म्हणून सोलापूरला २० फेब्रुवारीस बदली केली.
वडगाव मावळ : मावळ तहसीलदारच्या खुर्चीवर मीच बसणार, यासाठी दोन तहसीलदारांची चढाओढ सुरू झाली आहे. एकमेकांविरुद्ध न्यायालयात धाव घेतल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तहसीलदारांची खुर्ची रिकामी आहे.
मावळच्या तहसीलदारपदी रणजित देसाई यांची नियुक्ती झाली होती.कार्यकाळ संपायला अजून अवधी असताना लोकसभेच्या निवडणुकीचे कारण दाखवून त्यांची सहायक अन्यधान्य पुरवठा अधिकारी म्हणून सोलापूरला २० फेब्रुवारीस बदली केली. त्यांच्या जागी वैशाली वाघमारे यांची नियुक्ती झाली. वाघमारे यांनी २० तारखेलाच पदभार स्वीकारला. अन्यायकारक बदली झाल्याने देसाई यांनी मॅटकडे धाव घेतली. तेथे त्यांना स्थगिती मिळाली. त्यामुळे देसाई हे पुन्हा पदभार स्वीकारतील असे वाटत असताना वाघमारे यांनी मॅट न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या दोन तहसीलदारांच्या वादात ऐन निवडणुकीच्या तोंडावर आठवड्याभरापासून पद रिक्त असल्याने तहसीलदाराविना नागरिकांची महत्त्वाची कामे
रखडली आहेत.
सोन्याचे अंडे देणारा तालुका
मावळ तालुका सोन्याचे अंडे देणारा तालुका असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचा समज आहे. विविध खात्यांतील शासकीय अधिकारी या ठिकाणी पोस्टिंग घेण्यासाठी लाखो रुपये मोजतात. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे असल्याने ते कारण पुढे करून कार्यकाळ पूर्ण न होताच बदल्या केल्या गेल्यात. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह विविध खात्यांतील अधिकारी त्रस्त आहेत. काही अधिकारी यांनी झालेल्या बदल्यांबाबत स्थगिती आणली. येत्या दोन दिवसांत पोलीस अधिकारी यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा आहे. त्याची जागा घेण्यासाठी राजकीय आश्रय घेऊन अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे.