उपमहापौरांच्या प्रस्तावाला ब्रेक
By admin | Published: March 25, 2015 12:21 AM2015-03-25T00:21:57+5:302015-03-25T00:21:57+5:30
मोठया सोसायटयांचा किचन आणि बाथरूम मधून निघणारे पाणी (ग्रे वॉटर) स्वतंत्र जलवाहीने द्वारे संकलीत करून त्यावर प्रक्रीया करण्याचा प्रस्ताव उपमहापौर आबा बागूल यांनी ठेवला होता.
पुणे : मोठया सोसायटयांचा किचन आणि बाथरूम मधून निघणारे पाणी (ग्रे वॉटर) स्वतंत्र जलवाहीने द्वारे संकलीत करून त्यावर प्रक्रीया करण्याचा प्रस्ताव उपमहापौर आबा बागूल यांनी ठेवला होता. मात्र, एकाच प्रभागात असतानाही, या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात न आल्याने या प्रस्तावास स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी ब्रेक लावला आहे.
हा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीत मान्यतेसाठी आल्यानंतर कदम यांनी स्वत:च त्यावर अक्षेप घेतल्याने या वरून महापालिकेत प्रभागातील वाद स्थायी समितीत पोहचल्याची चर्चा रंगली आहे. तर या प्रस्तावाबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर तसेच या प्रकल्पामुळे केवळ काही मोजक्याच सोसायटयांचा प्रश्न सुटणार असल्याने त्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी हा प्रस्ताव पुढे ढकण्यात आल्याचा खुलासा कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
प्रभाग क्रमांक ६७ मधून उपमहापौर बागूल आणि स्थायी समिती अध्यक्षा कदम महापालिकेवर निवडून आलेल्या आहेत. या प्रभागात प्रायोगिक तत्वावरील तब्बल ३ कोटी ९१ लाख रूपयांचा ग्रे वॉटर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बागूल यांनी दिला होता. त्यानुसार, प्रशासनाकडून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होत्या. त्यानुसार, बागूल उद्यान ते फुपाखरू उद्यान या आंबील ओढयाच्या कडेला असलेल्या काही सोसायटयांमधील ग्रे वॉटर स्वतंत्र जलवाहीनी द्वारे बागूल उद्यानात संकलीत करून त्यावर त्या ठिकाणी प्रक्रीया केली जाणार आहे. मात्र, हा प्रकल्प संपूर्ण प्रभागासाठी असताना, प्रत्यक्षात हा केवळ बागूल यांच्या सांगण्यानुसार ठेवण्यात आला, तसेच आपणही त्या प्रभागाच्या सदस्या असताना, आपल्या कोणतीही विचारणा करण्यात आली नाही. याबाबत कदम यांनी समितीच्या बैठकीतच नाराजी व्यक्त केली. तसेच या ठिकाणी सोडल्या जाणा-या पाण्याच्या दूर्गंधीमुळे नागरीक त्रस्त असल्याने त्याबाबत आपण वारंवार उपाय योजना करण्याच्या सूचना देऊनही अद्याप काहीच हालचाली होत नाही आणि हा प्रस्ताव लगेच तयार केला जातो याबाबतही कदम यांनी अधिका-यांना धारेवर धरले. तसेच हा प्रस्ताव एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार, हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
प्रभागातील वाद
उपमहापौर आबा बागूल यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांना काहीच माहिती नसल्याने त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. बागूल व कदम एकाच प्रभागातील असल्याने हा वाद समोर आला.