विश्वासाच्या नात्याला ‘हॅकिंग’मुळे तडा; नजर ठेवण्यासाठी जोडपी करीत आहेत एकमेकांचे फोन हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:22 AM2023-04-26T11:22:25+5:302023-04-26T11:22:37+5:30
सोशल मीडियावरील ॲक्टिव्हिटी होते कंट्रोल...
- सतीश पाटील
पिंपरी : प्रेमाचे नाते विश्वासाचे प्रतीक आहे; मात्र या विश्वासाला तडा जाऊ लागल्याने प्रियकर-प्रेयसी असो; की पती-पत्नी एकमेकांचे मोबाइल हॅक करीत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. ही जोडपी अविश्वासाच्या जाळ्यात अडकल्याने एकमेकांचेच मोबाइल हॅक करीत जोडीदार अथवा दुसऱ्याचेच चॅटिंग बघत आहेत.
जोडप्यांचा एकमेकांवर विश्वास नसल्यास मोबाइल हॅक करून एकमेकांच्या ॲक्टिव्हिटीवर ‘वॉच’ ठेवत आहेत; तसेच संशय घेणारे साथीदार जोडीदाराचा अथवा प्रियकर-प्रेयसीचा कॉलडेटा आणि मेसेज याचीही मोबाइल हॅकिंग करून माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. काही ‘टेक्नोसॅव्ही’ तरुण केवळ पाच ते दहा हजार रुपयांत स्पायवेअर टाकून मोबाइल हॅक करून देत आहेत. अशा ‘टेक्नोसॅव्ही’कडून काही युवतीही प्रियकराचा मोबाइल हॅक करून चॅटिंग, फोटो, व्हिडीओ आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावरील ॲक्टिव्हिटी होते कंट्रोल
काही जण जोडीदाराच्या फेसबुकला मोबाइलमध्ये सुरू करून ठेवतात. याद्वारे समोरच्याचे फेसबुकवरील ॲक्टिव्हिटी कंट्रोल करीत असतात. तर काही जण आपल्या जोडीदाराचे व्हाॅट्सॲप स्कॅन करून ते मोबाइलमध्ये सुरू ठेवण्याची शक्कल शोधून व्हॉट्सॲपवर अप्रत्यक्ष पाळत ठेवताना दिसून येतात. काही प्रकरणांत ‘गूगल क्रोम’मध्ये सेटिंग करून आपला ई-मेल आयडी घुसवून समोरचे संपूर्ण मेसेज, फोटो, कॉन्टॅक्ट, लोकेशन इत्यादी डिटेल्स मिळविल्याचे समोर येत आहे.
हॅकिंग टाळण्यासाठी...
- मोबाइलला बायोमेट्रिक, पीन लॉक करून ठेवा.
- फोन दुसऱ्याकडे दिल्यास प्रत्यक्ष लक्ष ठेवा.
- नजरचुकीने कोणी फोन हाताळल्यास सुरक्षा तपासणी करा.
- संशयास्पद ॲक्टिव्हिटी दिसल्यास मोबाइलची तपासणी करा.
- हॅकिंगची शंका आल्यास मोबाइल सुरक्षित करा.
- अनोळखी व्हाॅट्सॲप कॉलिंग, मेसेज रिसिव्ह करू नका.
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
- कोणताही डेस्क ॲप आणि क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करू नका.
- सिस्टीम सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन अपडेट ठेवा.
- अनट्रस्टेड ॲप डाऊनलोड करू नका.
- एपीके फॉरमॅटमधील ॲप ठेवू नका.
- धोकादायक ॲप अनइन्स्टॉल करा.
- एक्सेस केलेले मेल सुरक्षित करा.
- व्हॉट्सॲप, फेसबुक आणि कोठे लिंक असल्यास लॉग आऊट व्हा.
- बॅटरी लवकर संपते
- मोबाइल हीटिंग अर्थात गरम होतो.
- डाटा पॅक लवकर संपतो.
- स्क्रीन फ्लॅक्चुएट होते.
- अनवाँटेड ॲप दिसू लागतात.
- अचानक स्पॅम मेसेज किंवा ई-मेल वाढतील.
- मोबाइल मेमरी स्टोअरेज अचानक कमी होईल.
नात्यात कटुता येऊ देऊ नका
नाते कोणतेही असो... ते मग पती-पत्नी, जीवलग मित्रांचे, प्रेमीयुगुलांचे असो की, भावाबहिणीचे. जोवर त्या नात्यात विश्वास आहे, तोवर त्यात गोडवा असतो. एकदा का तो विश्वास संपला की, त्या नात्यातले प्रेम संपते आणि मग उरते ती फक्त कटुता. या कटुतेनच जन्माला येतो परस्परांबद्दलचा संशय. त्यामुळे ही कटुता टाळायची असेल, तर अगोदर परस्परांना समजून घेण्याची गरज आहे. एकमेकांच्या भावभावनांचा, अस्तित्वाचा आदर करणे शिकले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. त्यांची व्यक्तिमत्त्वे वेगळी आहेत, इतके जरी समजून घेता आले, तरी कटुता व नंतरचा संशय खूपशा प्रमाणात कमी होऊ शकतो.
सोशल मीडियाचा वापर जपून, जबाबदारीचे भान हवे
सोशल मीडियामुळे नवविवाहितांच्या नातेसंबंधांवर परिणाम झाला असून, विश्वासाच्या नात्याला तडा जात आहे. पूर्वी तणाव येण्याची जी कारणे होती, त्यात कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक अशी विविध कारणे होती. त्यात आता सोशल मीडियाची भर पडली आहे. सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक झाल्यामुळे प्रामुख्याने नातेसंबंधांमध्ये कटुता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर जपून आणि जबाबदारीने करायला हवा. आपल्यावर कुणाचा तरी ‘वॉच’ आहे, हे ध्यानात घेऊन डेटा पाठवावा. एकदा डेटा पोस्ट केल्यानंतर तो डिलीट करता येत नाही. त्यामुळे आपण जो काही डेटा पाठवतो, तो पाठविण्याअगोदर दहा वेळा विचार करावा, तसेच ती पोस्ट पाठविणे खरेच आवश्यक आहे का, याचे उत्तर आपण स्वत:लाच विचारावे आणि जर या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आले, तरच पोस्ट पुढे शेअर करावी, तसेच आपण जी पोस्ट पाठवितो, त्याची जबाबदारी घ्यायला आपण जबाबदार आहोत का, आपण पाठविलेल्या पोस्टमुळे समाजात, नातेसंबंधांत कटुता, द्वेष निर्माण होणार नाही ना, हे पाहूनच पोस्ट पाठवावी. या साध्यासोप्या गोष्टींचे पालन सोशल मीडिया वापरताना केल्यास पुढील अनर्थ मोठ्या प्रमाणात टळतील.
- श्री. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड.