धूळ, धुरामुळे रोखला चऱ्होलीकरांचा श्वास
By admin | Published: January 14, 2017 02:39 AM2017-01-14T02:39:59+5:302017-01-14T02:39:59+5:30
आळंदी-पुणे पालखी महामार्गाचे संथ गतीने चाललेले काम व याच परिसरात असलेल्या खडी क्रशर आणि सॅण्ड कंपन्यांतून अवैधपणे हवेत
भोसरी : आळंदी-पुणे पालखी महामार्गाचे संथ गतीने चाललेले काम व याच परिसरात असलेल्या खडी क्रशर आणि सॅण्ड कंपन्यांतून अवैधपणे हवेत सोडली जाणारी धूळ यामुळे चऱ्होलीकर हैराण आहेत. दिवसभर परिसरात धूळयुक्त वातावरण असल्याने परिसरातील रहिवाशांना व दररोज या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना श्वसनाच्या व आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
आळंदी, चऱ्होली भागातून भोसरी, विश्रांतवाडी व स्पाईन रोड भागात वाहनांची मोठी रहदारी असते. आळंदीकडून पुण्याकडे जाणाऱ्या पालखी महामार्ग रुंदीकरणाचे काम काम गेल्या वर्षभरापासून संथ गतीने सुरु असून, मॅगझीन चौक परिसरातील काही भाग सोडला, तर दिघीपर्यंतचा सर्वच रस्ता अर्धवट आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांमुळे दिवसभर धूळ हवेत पसरत असते. त्याचा दुचाकीस्वार वाहचालकांना त्रास होत आहे.
वडमुखवाडीकडून स्पाईन रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर खडी व क्रशर संबंधित काम करणाऱ्या, तसेच सॅण्ड ब्लास्टिंग, पेव्हिंग ब्लॉक व स्प्रे पेंटिंगची कामे करणारे काही कारखाने आहेत. या कारखान्यांत उघड्यावरच काम चालते तसेच खडीच्या कामात निर्माण होणारी धूळ हवेत सोडली जात असल्याने या भागावर धुळीमुळे धुकेसदृश वातावरण असते. या कंपन्यांच्या बाबतीत परिसरातील रहिवाशांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रदूषण नियामक मंडळ व महापालिका कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.अशा धुळीमुळे श्वसनाचे, डोळ्यांचे व त्वचेचे आजार परिसरातील नागरिकांना जाणवू लागले आहेत. अवैधरीत्या धूळ हवेत सोडणाऱ्या कंपन्यांवर महापालिकेने त्वरित कारवाई करावी, तसेच पालखी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच रस्त्याचे काम चालू असताना धूळ न पसरण्यासाठी संरक्षक पत्रे लावावेत. नागरिकांना रहदारीसाठी पर्यायी रस्त्याची बांधणी करावी, अशी मागणी चऱ्होलीतील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)