रावेतमधील स्पाइन मार्गावर ‘नो ट्रॅफिक व्हायलेशन झोन’मुळे रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:38 PM2017-12-09T16:38:41+5:302017-12-09T16:42:42+5:30

शहरातील अनेक ठिकाणी नित्याची झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नुकतेच वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोनअंतर्गत कारवाई सुरू केली आहे.

Breathing with a 'No Traffic Violation Zone' on the Spine Road in Ravet | रावेतमधील स्पाइन मार्गावर ‘नो ट्रॅफिक व्हायलेशन झोन’मुळे रस्त्याने घेतला मोकळा श्वास

रावेतमधील स्पाइन मार्गावर ‘नो ट्रॅफिक व्हायलेशन झोन’मुळे रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Next
ठळक मुद्देअनधिकृतपणे या मार्गावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई उभ्या असणाऱ्या वाहनामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत असे रस्त्याच्या मधोमध

रावेत : बिजलीनगर ते वाल्हेकरवाडी या स्पाइन मार्गावर नियमित दुतर्फा वाहने, विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे हातगाडीधारक अनधिकृतपणे उभी केली जात होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. शहरातील अनेक ठिकाणी नित्याची झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नुकतेच वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोनअंतर्गत कारवाई सुरू केली आहे.
यानुसार महत्त्वाची ठिकाणे जाहीर केली आहेत. त्यामध्ये चिंचवड विभागातील बिजलीनगर ते वाल्हेकरवाडी टी जंक्शन या स्पाईन मार्गाचा समावेश केला आहे. या अनुषंगाने चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या मार्गावर अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या सर्व वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई केली व या पुढे यामार्गावर वाहने उभी केल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबी वाहन मालक आणि चालक यांना दिली तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांना या मार्गावर उभे राहण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मज्जाव केला असून अतिक्रमण करणाऱ्या या मार्गावरील पाच हातगाड्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या आहेत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून येथे होणाऱ्या वाहतूककोंडीचा त्रास कमी झाला आहे.
अनधिकृतपणे या मार्गावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई केल्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला. चिंचवड वाहतूक विभागास नागरिकानी वारंवार तक्रारी करुन सुद्धा वाहतूक विभाग या वाहनांवर कोणत्याही प्रकारची करवाई करत नसे. त्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक विभागाबाबत उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत होती. परंतू कारवाई केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवनगर विकास प्राधिकारणाने लाखो रुपये खर्च करून बिजलीनगर ते वाल्हेकरवाडीला जोडणारा परिसरातील सर्वात मोठा रस्ता काही वर्षापूर्वी तयार केला. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. काही दिवस येथून सुरळीत वाहतूक सुरू होती. कालांतराने या मार्गावर हळूहळू वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या पार्किंगसाठी उभ्या केल्या जाऊ लागल्या. आज ही परिस्थिती रेलविहार वसाहत ते चिंचवडे चौकापर्यंत वाढत गेली होती. रस्त्याच्या दुतर्फा दररोज किमान साठ ते सत्तर मोठ्या चारचाकी गाड्या आणि २५ ते ३० हातगाडी अनधिकृतपणे उभ्या केल्या जात होत्या. या मागार्चा वापर अनेक जड वाहने व इतर वाहने निगडी, चिंचवडगाव, रावेत मार्गे डांगे चौक आदी ठिकाणी जा ये करण्यासाठी नियमितपणे करतात. परंतु रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठी वाहने दररोज उभी केली जातात. त्या मुळे नेहमी वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या मार्गावरुन परिसरात असणाऱ्या अनेक विद्यालय व महाविद्यालयात हजारो विद्यार्थी पायी सायकल वरुन ये-जा करीत असतात. दोन्ही बाजुंनी मोठी वाहने उभी असल्यामुळे मुलांना इतर वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होवून विद्यार्थी जखमी झाले होते. दररोज या मार्गावर नागरिक, ज्येष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ फेरफटका मारत असतात. उभ्या असणाऱ्या वाहनामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याच्या मधोमध चालावे लागत असे.  बऱ्याच वेळा इतर वाहनाचा धक्का लागून ज्येष्ठ नागरिक जखमी झाले  आहेत तर काही नगरिकाना कायमचे अपंगत्व आले आहे. अशा प्रकारच्या अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांचा अडोसा चोरट्यांनी घेवून महिला व मुलींच्या अंगावरील दागिने हिस्कावण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या वाहनचालकास नागरिकांनी वाहने उभी करण्यास मनाई केल्यास चालक नागरिकांना दमदाटी करत असत. अशा वेळी वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहन चालकाना मज्जाव करण्या ऐवजी मात्र बघ्यांची भूमिका घेत असत  त्या मुळे नागरिक व वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत होती. 

मागील अनेक दिवसांपासून या मार्गावर अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आमचे प्रयत्न होते. आता वाहतूक विभागाने हा रस्ता नो ट्रॅफिक व्हायलेशन झोन केल्यामुळे दिवसेंदिवस अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवरील कारवाईमुळे येथे वाहने थांबत नाहीत. अशा परिस्थितीत जर कोणी या मार्गावर वाहने उभी केली तर दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल. येथून पुढे कारवाईत सातत्य ठेवण्यात येईल. या मार्गावर वाहने उभी केल्यास त्यांच्या वाहनावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. लवकरच या चौकसह चिंचवड वाहतूक विभागाच्या हद्दीत असणाऱ्या मुख्य चौकामध्ये वाहन चालक आणि नागरिकांना सूचना देण्यासाठी कायमस्वरूपी ध्वनिक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चाप बसेल.
- संजय पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, चिंचवड

Web Title: Breathing with a 'No Traffic Violation Zone' on the Spine Road in Ravet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.