बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी लाच; पिंपरी पालिकेतील लिपिकास पकडले रंगेहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 04:02 PM2017-12-22T16:02:41+5:302017-12-22T16:05:16+5:30
महापालिका शाळेच्या बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील लेखा विभागातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे.
पिंपरी : महापालिका शाळेच्या बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील लेखा विभागातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेबाराला करण्यात आली. प्रकाश जयसिंग रोहकले, वय ३९, कनिष्ठ लिपिक, रा. पिंपलेश्वर निवास, तुळजाभवानीनगर, पिंपळे गुरव) असे लाचखोराचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीस वर्ष वयाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत बायोमेट्रिक मशिन्स दुरुस्तीचे काम आहे. हे एक लाख ६४ हजार रुपयांचे बिलाचे फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन बिलाचा चेक देण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागातील रोहकले यांनी चार हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सुरेखा घार्गे यांनी सापळा लावून रोहकले यांना रंगेहात पकडले.
लेखा विभाग पुन्हा चर्चेत
बिले मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागात अडवणूक केली जाते. सुमारे दीडशे कोटींची बिले मंजूर करण्यासाठी तीन टक्के घेतल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. पंतप्रधान कार्यालयात याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यानंतरही बिले मंजूर करण्यासाठी अडवणूक लूट सुरू असल्याचे प्रकरण आज उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईने महापालिकेतील लेखाविभागात अधिकारी आणि कर्मचाºयांची लाचखोरी उघडकीस आली आहे. लेखाविभागातील लाचखोरी रोखावी, कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.